इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचा जामीन आज रद्द करण्यात आला असून त्याची बालगृह सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आज बाल न्याय हक्क न्यायालयात दोन्ही बाजूने कोर्टात युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने १४ दिवसांसाठी बालसुधार गृहात ठेवण्याचा निर्णय दिला.
या अगोदर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आज त्याच्यावर न्यायालयात आणत असतांना शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अग्रवालला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्ट परिसरातच हा प्रकार घडला. सोमवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे छत्रपती संभाजीनगर परिसरात विशाल अग्रवालला अटक केली.
कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याचे ते वडील आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गु्न्हा दाखल केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्यामुळे मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठावूक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशालवर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम ७५ आणि ७७ अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.