इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगरः लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असून प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. संरक्षणव्यवस्था थोडे उठा. माणूस गोदामापर्यंत आला आहे, अशा शब्दांत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी व्हिडिओ ट्विट करत निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणेला धारेवर धरले आहे.
अहमदनगरमध्ये ‘ईव्हीएम’ ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्तीचा वावर सुरू असल्याचा आरोप लंके यांनी केला आहे. कुंपणच आता शेत खाते, असे म्हणत त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. ‘ईव्हीएम’ ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एक व्यक्ती चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न करीत होती; परंतु माझ्या सहकाऱ्यानी तो हाणून पाडला.
माझे सहकारी हा इसम पकडू शकतात. मग, सुरक्षा यंत्रणा भेदून जाईपर्यंत त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खात आहे, असे ते म्हणाले. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असे नीलेश लंके म्हणाले.