नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वंचित बहुजन विकास आघाडीने दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मालती शंकर थलवी यांची उमेदवारी घोषीत केल्यानंतर आज नाशिक लोकसभा मतदार संघासाठी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीमुळे जिल्हयात वंचितच्या दोन्ही उमेदवारांची चर्चा आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात सरळ लढत असली तरी वंचितमुळे येथे तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे हा मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे. तर शिंदे गटाकडून इच्छुकांची नावे मराठा समाजाची आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या तिन्ही उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे. भुजबळांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाच्या तीन उमेदवार रिंगणात उतरणार असल्यामुळे येथील समीकरणही बदलणार आहे.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार डॅा. भारती पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित होते. पण, आता माकपतर्फे जे.पी.गावीत हे उमेदवारी करण्यावर ठाम आहे. तर वंचितने उमेदवारी घोषीत केल्यामुळे चौरंगी लढत होणार आहे.