नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हॉटेलमध्ये चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा पोलीसांनी उदध्वस्त केला. गंगापूररोडवरील हॅाटेलमध्ये केलेल्या कारवाईत पोलीसांनी हुक्का पॉट आणि वेगवेगळया फ्लेवरची तंबाखू असा सुमारे अकरा हजाराचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आठ ग्राहकांसह हॉटेल व्यवस्थापक व कर्मचारी अश्या ११ जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल व्यवस्थापक प्रशांत देवेंद्र खिल्लर (मुळ रा.ओडीसा हल्ली गोवर्धन गंगापूर), वेटर राहूल रमेश साळवे (रा.श्रमिकनगर,सातपूर) व साहिल जिभाऊ सोनवणे (रा.सटाणा),प्रतिक रमेश आहेर ,आशितोष रोजश पगारे, शुभम सुनिल पवार (रा. तिघे शिवशक्तीनगर जेलरोड),विशाल रमेश देशपांडे (रा.काळेनगर,गंगापूररोड),विशाल विजय व्हिजन (रा.बळवंतनगर,गंगापूररोड),निखील सुभाष पाटील (रा.नवीन पंडीत कॉलनी,),संदिप दिनेश खंडेलवाल (रा.विकास कॉलनी,त्र्यंबकरोड) व पुरूषोत्तम इश्वरदास उबराणी (रा.रामेश्वरनगर गंगापूररोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांदे्र यांनी फिर्याद दिली आहे. सावरगावरोडवरील बरॅको हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास छापा टाकला असता संशयित हुक्का ओढतांना मिळून आले. हॉटेल व्यवस्थापक व त्याच्या कर्मचा-यांनी ग्राहकांना बेकायदा बसण्यास जागा आणि हुक्काचे साहित्य उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून हुक्का पॉट व वेगवेगळया फ्लेवरची तंबाखू असा सुमारे १० हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रविंद्र मोहिते करीत आहेत.