इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्रातील मजबूत संबंधांना अधिक बळकट करणे हे या भेटीचे उद्दिष्ट आहे. दोन्ही देशातील संरक्षण क्षेत्रातील संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय गती प्राप्त झाली आहे.
जनरल अनिल चौहान आपल्या या दौऱ्यात फ्रान्सच्या वरिष्ठ नागरी आणि लष्करी नेतृत्वाशी संवाद साधणार आहेत. यामध्ये त्यांचे समकक्ष फ्रेंच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CEMA), जनरल थिएरी बर्कहार्ड आयएचईडीएन (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हायर डिफेन्स स्टडीज) चे संचालक आणि आयुध विभागाचे महासंचालक यांचा समावेश आहे.
जनरल अनिल चौहान फ्रेंच स्पेस कमांड, लँड फोर्सेस कमांडला भेट देतील आणि इकोल मिलिटेअर (स्कूल ऑफ मिलिटरी) येथे लष्कर आणि जॉइंट स्टाफ कोर्सच्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करतील. ते सॅफ्रान ग्रुप, नेव्हल ग्रुप आणि दसॉ एव्हिएशनसह फ्रान्समधील काही प्रतिष्ठित संरक्षण उद्योगांना भेट देणार आहेत आणि त्यांच्याशी संवादही साधणार आहेत.
सीडीएस जनरल अनिल चौहान न्यू वे -चॅपेल मेमोरियल आणि विलर्स-गुइस्लेन येथील भारतीय स्मारकाला भेट देऊन पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ पुष्पचक्र अर्पण करतील.