इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. शुक्रवारीच त्यांच्या मतदार संघात मतदान झाले आणि आज त्यांचे निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला.
कुंवर सर्वेश सिंह यांना कँन्सर झाला होता. ते उमेदवारी जाहीर झाल्यापासून रुग्णालयात होते. व्यवसायाने उद्योजक असलेले कुंबर सिंह हे उत्तर प्रदेशातील बाहुबली नेत्यांपैकी एक होते. २०१४ मध्ये ते मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. खासदार होण्यापूर्वी ते ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते. सर्वेश सिंह यांचा मुलगा सुशांत सिंह हा बिजनौरच्या बढापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहे.
मुरादाबादमध्ये पहिल्या टप्याचे मतदान झाले. त्यांनंतर ही घटना घडल्यामुळे मतदार संघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्वेश सिंह यांना भाजपने चौथ्यांदा मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते.