चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे. त्या निमित्ताने चांदवड तालुक्यातील भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालयाचे प्रसिद्ध कला शिक्षक देव हिरे यांनी तब्बल तीन तासात रांगोळीच्या वापर करून पेढ्यावर ही पोर्ट्रेट रांगोळी साकारून महामानवास एक आगळे वेगळे अभिवादन केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदवड नगरीत चांदवडी रुपयाचा प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा आहे. डोंगर रांगांमध्ये वसलेले हे ऐतिहासिक चांदवड शहर दुग्धव्यवसाय व खव्यासाठी ही प्रसिद्ध आहे. याच खव्यापासून चांदवडी पेढा तयार होतो. हा पेढा सर्वदूर आपली गोडी टिकवून आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण तोंड गोड करून पेढा भरवून करत असतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त याच चांदवडी पेढ्यावर डॉ.आंबेडकरांची प्रतिमा रांगोळीच्या सहाय्याने साकारून ही भीम जयंती अधिक गोड व्हावी म्हणून कला शिक्षक देव हिरे यांनी ही रांगोळी पेढ्यावर काढली आहे.