इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीमधील धाराशीव व नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार असल्याचे निश्चित झाल्याचे वृत्त आल्यानंतर नाशिक लोकसभेचे शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे हे मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले आहे. आतापर्यंतची ही चौथी भेट असणार आहे. आतापर्यंत नाशिकची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसल्यामुळे गोडसे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकमधून छगन भुजबळ तर धारशीवमध्ये विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.या दोन्ही जागांवर महायुतीमधील तीन्ही पक्षांनी दावा केला होता. पण, त्यात राष्ट्रवादीच्या अजित पवारांना या जागा राखण्यात यश मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकच्या जागेवर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी परवा प्रचाराला सुरवात केली होती. त्यानंतर उमेदवारी जाहीर झालेली नसतांना प्रचार कसा सुरु केला असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. तर दुसरीकडे भाजप मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण पाटील यांनी नाशिकची जागा भाजपला मिळावी असा आग्रह धरला होता. तर छगन भुजबळ यांनी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचे काम करु असे सांगितले होते. पण, त्यानंतर नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे वृत्त आले. त्यामुळे खा. हेमंत गोडसे हे मुंबईला गेले आहे.