नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक पोलिसांनी दीड कोटीचा गंडा घालून अडीच वर्ष गुंगारा देणा-या आरोपीला गोव्यातून अटक केली आहे. हा आरोपी नेपाळला पळून जाणार होता. पण, पोलिसांनी त्याला अगोदरच सापळा रचून ताब्यात घेतले. माजी सैनिकासह त्यांच्या नातेवाईकास कर्नाटकातील या भामट्याने दीड कोटींची फसवणूक केली आहे. शेअर मार्केटचा ब्रोकर असल्याचे भासवून भामट्याने गुंतवणुकीवर दरमहा चार टक्के दराने मोबदला देण्याचे आमिष दाखवत हा गंडा घालत हातो. गेली अडीच वर्ष गुंगारा देणारा भामटा नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच शहर पोलीसांच्या गुंडा विरोधी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
युवराज बाळकृष्ण पाटील (४२ रा.बेळगाव,कर्नाटक) असे संशयित भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी माजी सैनिक संजय बिन्नर यांनी फिर्याद दिली होती. बिन्नर यांच्यासह त्यांच्या नातेवाईकाना गाठून संशयिताने शेअर मार्केट मधील अॅक्युमेंन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून तो ब्रोकर असल्याचे भासविले होते. बिन्नर यांच्या विश्वास संपादन करीत त्याने गॅरेन्टेड रिटर्न या तत्वावर चार टक्के दराने दरमहा परताव्याचे आमिष दाखविले. त्यामुळे बिन्नर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनीही मार्च २०२० ते ऑगष्ट २०२० दरम्यान संशयितांकडे तब्बल १ कोटी ३८ लाख ५० हजार रूपयांची गुंतवणुक केली. मात्र संशयिताने अचानक गाशा गुंडाळल्याने याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपहार,फसवणुक व महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, संशयिताबाबत गुंडा विरोधी पथकास माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. कुठलाही सुगावा नसतांना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या अडीच वर्षापासून संशयित कर्नाटक,बिहार,उत्तराखंड,पश्चिम बंगाल, अरूणाचल प्रदेश,गुजरातसह महाराष्ट्र आदी राज्यात अस्तित्व लपवून वावरत होता. सध्या तो गोवा राज्यात असून लवकरच नेपाळकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने गोवा गाठले होते.
रविवारी (दि.३१) पथकाने पणजी येथील शांतीनेझ चर्च भागात त्यास हुडकून काढत इडन रॉक बिल्डींगमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. संशयिताच्या ताब्यातून सात मोबाईल व पासपोर्ट असा सुमारे १ लाख ९० हजाराचा ऐवज जप्त केला आहे. संशयितास मुद्देमालासह आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सुर्यवंशी,प्रदिप ठाकरे,गणेश भागवत,अक्षय गांगुर्डे,मलंग गुंजाळ,डी.के.पवार,सुनिल आडके,राजेश सावकार,नितीन गौतम,गणेश नागरे,निवृत्ती माळी,प्रविण चव्हाण,सुवर्णा गायकवाड आदींच्या पथकाने केली.