डॉ. राजू पाटोदकर
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पुणे विभागातील दहा लोकसभा मतदार संघात दोन टप्पात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे व विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकसभा निवडणूक नि:पक्ष, पारदर्शी आणि आदर्श आचारसंहितेचे संपूर्ण पालन करुन पार पाडण्यासाठी पुणे विभाग सज्ज आहे. त्याची ही थोडक्यात माहिती…
पुणे विभागातील 10 लोकसभा मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार विभागातील बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे 2024 रोजी होणार आहे. ज्यासाठीची अधिसूचना 12 एप्रिल रोजी तर मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदान चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी होणार असून याची अधिसूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
विभागात सुमारे 2 कोटी 4 लाख 66 हजार मतदार नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 5 लाख 61 हजार पुरुष व 99 लाख 4 हजार 366 स्त्री मतदार आहेत. विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये 21 हजाराहून अधिक मतदान केंद्र असून त्यापैकी पुणे 8 हजार 382, सातारा 3 हजार 25, सोलापूर 3 हजार 617, कोल्हापूर 4 हजार 16 व सांगली 2 हजार 448 मतदान केंद्र आहेत. विभागात सुमारे 1 लाख 25 हजार मनुष्यबळ निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
पात्र मतदार
पुणे जिल्ह्यात 81 लाख 27 हजार 19 मतदार असून त्यामध्ये 42 लाख 44 हजार 314 पुरुष व 38 लाख 82 हजार 10 स्त्री मतदार आहेत. तर 81 हजार 337 दिव्यांग मतदार, 80 वर्षावरील 2 लाख 48 हजार 790 व 695 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 25 लाख 64 हजार 427 मतदार असून त्यापैकी 13 लाख 5 हजार 277 पुरुष व 12 लाख 59 हजार 56 स्त्री मतदारांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 36 लाख 27 हजार 75 मतदार असून त्यापैकी 18 लाख 76 हजार 498 पुरुष व 17 लाख 50 हजार 297 महिला मतदार आहेत. तर 27 हजार 194 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एकूण 37 लाख 23 हजार 134 मतदार आहेत. त्यापैकी 18 लाख 97 हजार 356 पुरूष तर 18 लाख 25 हजार 598 स्त्री व 180 इतर मतदार आहेत. 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 39633 असून सैनिकी मतदारांची संख्या 8923 आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 25911 आहे. 85 व त्यापेक्षा जास्त वयोगटातील मतदार संख्या 40053 आहे. सांगली मतदार संघात 24 लाख 25 हजार 317 मतदार असून त्यापैकी 12 लाख 37 हजार 796 पुरुष व 11 लाख 87 हजार 405 स्त्री मतदार, 116 तृतीयपंथी, 85 वर्षावरील 39 हजार 232, दिव्यांग 20 हजार 616 मतदार आहेत.
मतदान जनजागृती
भारत निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या अधिकाधिक बळकटीसाठी मतदारांमध्ये जागृती करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्याच्या हेतूने ‘स्वीप’ (SVEEP- Systematic Voters` Education & Electoral Participation) हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांतर्गत विविध माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून लोकशाहीचे महत्त्व विशद करणे आणि कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मतदान जागृतीसाठी स्वीपमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून वाड्या-वस्त्यांवर, आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून रॅली, विविध स्पर्धांमधून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मतदारांना सुविधा
दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ च्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रात प्रवेश करताना दिशादर्शक फलक, त्याठिकाणी सुस्थितीतील रॅम्प, व्हील चेअर, विश्रांती कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, प्रथमोचार पेटी, मतदान केंद्र तळमजल्यावर तसेच मतदान केंद्रांवर त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनतळ, मतदान केंद्रामध्ये जाताना रांगेत न थांबवता स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. असे ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक राहील.
मतदारांना आवाहन
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क जरुर बजवावा. नि:पक्ष आणि निर्भयतेने मतदान करण्यासाठी निवडणूक यंत्रणा आपल्या सदैव मदतीला असते. सर्व पात्र मतदारांनी मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवावी, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य करुन आपली लोकशाही अधिक बळकट करण्यास पुढे यावे. आपणही आपले कर्तव्य निभावू….चला मतदान करुया….