इंडियादर्पण ऑनलाइन डेस्क
आयपीएल २०२४ चा हंगाम लवकरच सुरू होतो आहे. या हंगामाचे नवे वैशिष्ट्य म्हणजे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा नवज्योतसिंग सिद्धू या प्रख्यात समालोचकाचा आवाज प्रेक्षकांच्या कानाला ऐकू येणार आहे. हिंदी समालोचन करताना क्रिकेटच्या बारकाव्यांबरोबरच हिंदी भाषेवरचे प्रभुत्व आणि त्याला शेरोशायरीची जोड ही सिध्दूची खासियत मानली जाते.
अनेकदा मैदानावर कंटाळवाणा सामना सुरू असेल तरीसुद्धा त्या सामन्यात प्रेक्षकांना केवळ समालोचनाच्या आधारे सामन्याशी जुळवून ठेवणा-या नवज्योतसिंग सिद्धूची समालोचनातली ही दुसरी इनिंग असणार आहे. त्याची पहिली इनिंग नक्कीच यशस्वी ठरली होती आणि असंख्य प्रेक्षक त्याच्या समालोचनाचे फॅन्स झाले होते.
परंतु मधल्या काळात ‘राजकारण’ नावाच्या खेळपट्टीवर त्याने नशीब आजमावल्यानंतर आणि क्रिकेट इतके यश त्याला त्याखेळपट्टीवर न मिळाल्यानंतर हा “ठोको ताली” फेम समालोचक पुन्हा समालोचनाकडे परतणार आहे. आता ही दुसरी इनिंग पुन्हा एकदा काय रंग भरणार, हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.