नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत धावत्या दुचाकीच्या चैनमध्ये साडीचा पदर अडकल्याने रस्त्यावर पडलेल्या महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेवर आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता पांडूरंग येडे (३८ रा.दत्तनगर,चुंचाळे शिवार) असे मृत महिलेचे नाव आहे. अनिता येडे या औद्योगीक वसाहतीतून दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. धावत्या दुचाकीच्या चैनमध्ये त्यांच्या साडीचा पदर अडकल्याने त्या रस्त्यावर पडल्या होत्या.
या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने भाऊ हिरामण दिवे यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते.