वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
एअर इंडियाने नुकताच आपला नवीन इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ ‘सेफ्टी मुद्रा’ लॉन्च केला. यात भारतातील विविध शास्त्रीय आणि लोकनृत्यांमधून भारताच्या समृद्ध संस्कृतीचे चित्रण करण्यात आले आहे. या लोकनृत्यांमधून उड्डाण सुरक्षेशी निगडीत गोष्टीही समजावून सांगण्यात आल्या आहेत. एअरलाइन्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भरतनाट्यम, ओडिसी, कथकली, कथ्थक, घूमर, बिहू आणि गिद्धा यांसारखी अनेक लोकनृत्ये दाखवण्यात आली आहेत.
या व्हिडिओमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे. यामध्ये दाखविलेल्या प्रत्येक लोकनृत्याच्या सूचनांसोबत ‘मुद्रा’ किंवा हाताचे हावभाव वापरण्यात आले आहेत. एअर इंडियाने हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या X या प्लॅटफॉर्म वर पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘शतकांपासून भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोक-कला प्रकारांनी कथाकथन आणि सूचनांचे माध्यम म्हणून काम केले आहे. आज शास्त्रीय नृत्य आणि लोक-कला आणखी एक किस्सा सांगत आहेत, ही गोष्ट इनफ्लाइट सेफ्टीशी संबंधित आहे. सादर करत आहोत भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण नृत्य परंपरांनी प्रेरित एअर इंडियाचा नवीन सुरक्षा चित्रपट.’
एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनानुसार हा व्हिडिओ मॅककॅन वर्ल्ड ग्रुप एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष दिग्दर्शक भरत बाला, गीतकार प्रसून जोशी आणि गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या सहकार्याने बनवण्यात आला आहे. या व्हिडिओ मुळे प्रवाशांना सुरक्षेबाबत मनोरंजक पद्धतीने माहिती मिळाली आहे, हे नक्की!