पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकरी, व्यवसाय आणि व्यापार करणारे नागरिक प्रत्येक महिन्यात काही रक्कम बचत म्हणून बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करतात. यामध्ये सर्वाधिक पैसा बँकेत जमा केला जातो. धावपळीच्या आयुष्यात कोणालाही रांगेत उभे राहण्याची इच्छा नसते. हेच लक्षात घेऊन बँकांनी ग्राहकांच्या सुविधेसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे बँकांचा व्यवसाय चांगलाच वधारला आहे.
याच मार्गावरून मार्गक्रमण करताना भारतीय पोस्ट ऑफिसने आता इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ग्राहक घरबसल्या रोकड जमा किंवा हस्तांतरित करू शकतात. पोस्ट ऑफिसची इंटरनेट बँकिंग सेवा कशी अॅक्टिव्ह करायची हे जाणून घेऊयात.
पोस्ट ऑफिसमध्ये नेट बँकिंगचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना गृहशाखेत भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे. तिथे तुम्हाला अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागेल. एवढे केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक येईल. या लिंकवर क्लिक करून वेब पेजवर जाऊन न्यू अॅक्टिव्हेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
पोस्ट ऑफिसची नेट बँकिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला नेट बँकिंगचा पासवर्ड आणि दुसरा आर्थिक व्यवहाराचा पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नेट बँकिंगने व्यवहार करू शकतात. इंटरनेट बँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड बनवताना काही प्रश्न विचारले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुमचे पोस्ट ऑफिसच्या अकाउंटमध्ये इंटरनेट बँकिंग सुरू होईल.