नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञांनी जगभरातील सर्व चुंबकीय वेधशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे, सर्वात अचूक मॅग्नेटोमीटर पैकी एक असलेले ओव्हरहाउसर (ओव्हीएच) मॅग्नेटोमीटर विकसित केले आहे. यामुळे भूचुंबकीय नमुन्यांसाठी (सॅम्पलिंग) आवश्यक सॅम्पलिंग आणि संवेदन (सेन्सिंग) प्रयोगांचा खर्च कमी होऊ शकेल. अलीबाग चुंबकीय वेधशाळा (एमओ) येथे उभारण्यात आलेला सेन्सर, भूचुंबकीय क्षेत्राचे मोजमाप करण्यासाठी व्यावसायिक ओव्हीएच मॅग्नेटोमीटरवरील भारताचे अवलंबित्व दूर करू शकतो.
ओव्हीएच मॅग्नेटोमीटर, त्यांची उच्च पातळीवरील अचूकता, उच्च संवेदनशीलता आणि ऊर्जा वापरामधील कार्यक्षमता यासाठी ओळखले जातात आणि त्यामुळे जगभरातील सर्व चुंबकीय वेधशाळांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश कार्यक्रमांमध्ये त्याचा वापर केला जातो. भारतामध्ये मात्र आतापर्यंत त्याची आयात केली आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, भारत सरकारच्या डीएसटी अंतर्गत, भारतीय भूचुंबकत्व संस्था (आयआयजी) या स्वायत्त संशोधन संस्थेने तंत्रज्ञान विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून मॅग्नेटोमीटर विकसित केले आहे.
अलीबाग चुंबकीय वेधशाळा (एमओ) येथे भूचुंबकीय नमुन्यासाठी उभारण्यात आलेल्या सेन्सरद्वारे केलेल्या प्रयोगात असे आढळून आले, की सेन्सरने भूचुंबकीय दैनिक भिन्नता अचूकपणे पुनर्निमित केली, आणि भूचुंबकीय वादळ, अचानक निर्माण होणारे प्रवाह वगैरे, यांसारख्या अवकाशातील हवामानाबाबतच्या विविध घटनांच्या नोंदी अचूकपणे दर्शवल्या. या स्वदेशी बनावटीच्या मॅग्नेटोमीटरची कामगिरी, आयआयजीच्या चुंबकीय वेधशाळांमध्ये सध्या उभारण्यात आलेल्या व्यावसायिक ओव्हीएच सेन्सरच्या बरोबरीची आहे. सध्या या सेन्सरची त्याच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी चाचणी केली जात आहे.