इंडिया दर्पण विशेष लेखमाला
इंडिया बाईक राईडचा थरार
अटल टनेल
कडक्याची थंडी, बर्फवृष्टी खोल दऱ्या, उंच पर्वत, निमळता रस्ता, घाट अशा अत्यंत आव्हानात्मक स्थितीत आम्ही बाईकवरुनच प्रवास करीत होतो. आता आम्ही अटल टनेलच्या ठिकाणी जाणार होतो. त्याची प्रचंड उत्सुकता होती. पण, अतिशय खडतर प्रवासातून जाताना आमचा निश्चय ढासळतो की काय, असेच वाटत होते. अखेर आम्ही अटल टनेलच्या ठिकाणी पोहचलोय…
आहाहा काय सुंदर वाटलं तिथे पोहोचताना. जो काही पावसाचा, खडतर रस्त्यांचा सामना करावा लागला होता तो तिथे पोहोचता क्षणीच विरुन गेला. त्या सुंदर निसर्गरम्य अशा अटल टनलचे सौंदर्य नजरेत भरून घेतले. त्यावेळी आम्हा फ्रीडम मोटो रायडर्सच्या स्वागतासाठी काही तरी वेगळे नियोजन होते. अटल टनेलवर हिमाचल प्रदेशचे कर्मचारी आम्हासाठी पाच किलोचा केक घेऊन आले. आणि ते आमची वाट पाहत होते. अटल पॅनलच्या एन्ट्रीवर आम्ही सर्व ग्रुप जमल्यावर केक कटिंग झाले. खुप जल्लोष केला. आणि तो टनल क्रॉस करण्यास सुरुवात केली.
नऊ किलोमीटरचा असलेला हा अटल टनेल हा घोड्याच्या नाळीच्या आकारात बनवण्यात आलेला भारतातील सर्वात मोठा टनेल आहे. आणि माझ्या आयुष्यात मी पाहिलेला सर्वात स्वच्छ आणि अतिशय सुंदर रस्ता. हा टनेल डोळ्याचे पारणे फेडणारा होता. तो क्रॉस केल्यानंतर जिस्पा ८० किलोमीटर बाकी होते आणि तो सबंध ८० किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब होता.
माझे हात एवढे गोठले होते की ठिकठिकाणी थोडा ब्रेक घेणे, हॅन्डग्लोज काढून हात गरम करणे, पुन्हा पुढचा प्रवास सुरू करणे अशी कसरत करावी लागत होती. कसे बसे आम्ही सायंकाळी जवळ जवळ सात वाजेच्या दरम्यान जिस्पा येथे पोहोचलो. तेथे हिमाचल प्रदेशच्या खासदार नड्डाजी व त्यांचे सुपुत्र हे आमच्या वेलकम साठी थांबले होते. त्यावेळी तेथील तपमान उणे तीन होते. आम्ही सर्व एवढे थकलो होतो की, आमच्या रिक्वेस्ट वरून तेथील सांस्कृतिक कार्यक्रम कॅन्सल करण्यात आला. तो दुसऱ्या दिवशी शिफ्ट करण्यात आला.
आमची ही दुरावस्था पावसात भिजल्याने आणि कडाक्याच्या थंडीमुळे झाली होती. मी तर बिना जेवताच टेंट मध्ये झोपायला गेली. सकाळ कधी झाली ते मला कळलेच नाही. सकाळी उठून टेंटच्या बाहेर येऊन बघते तर काय, आमचा स्टे हा जवळच असलेल्या भागा नदीला लागून होता. रात्री अंधारात मला काहीच दिसले नाही. पण सकाळी उठून बघते तर आजूबाजूला हिमाचल प्रदेशचे अदभूत सौंदर्य दिसले. डोंगर आणि त्या डोंगरातून वाहत असलेली ती नदी हे दृश्य बघून आदल्या दिवशीचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल – [email protected]
India Bullet Bike Ride Himachal Pradesh Journey by Deepika Dusane