पाटणा (बिहार) – मुख्यमंत्री भलेही सुशासन बाबू या नावाने ओळखले जात असतील. परंतु भ्रष्टाचारामध्ये बिहार कोणत्याच राज्यापेक्षा कमी नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशा घटना सतत उघडकीस येऊन ही गोष्ट सिद्ध करत असतात. असेच एक प्रकरण उजेडात आले असून तपास संस्थेलाही तोंडात बोटे घालण्याची वेळ आली आहे.
येथील श्रम प्रवर्तन अधिकारी दीपक कुमार शर्मा यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचा काळा पैसा पाहून सगळेच अधिकारी आश्चर्यचकित झाले. पाटणा येथील दिघा परिसरातील महावीर कॉलनीतील त्यांच्या घरातून पथकाला पैशांनी भरलेल्या बॅग आणि पोते आढळले आहेत. नोटांची संख्या इतकी होती की नोटा मोजण्याचे मशीन मागवावे लागले.
अधिकार्यांच्या माहितीनुसार रोख रक्कम २ कोटी २५ लाखांच्या आसपास आहे. त्याशिवाय दीड कोटींहून अधिक मालमत्तेचाही ठावठिकाणा लागला आहे. घरातून सोन्याचे बिस्किट आणि हिरे-मोत्यांचे दागिने सापडले आहेत. त्यांची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. त्याशिवाय १५-२० बँकांचे पासबुक, डजनभर डेबिटकार्ड आणि जमिनीशी संबंधित काही कागदपत्रे मिळाले आहेत.
पाटण्याचे पोलिस उपायुक्त एस के मउआर यांनी दीपक कुमार यांच्याविरुद्ध मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती जमविल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. देखरेख ठेवणार्या पोलिस पथकाने दीपक कुमार यांच्या पाटणा, हाजिपूर, मोतिहारी येथील ठिकाणांवर छापे मारले. इतर ठिकाणी सापडलेल्या काळ्या पैशांचा अंदाज घेतला जात आहे.
अधिकारी दीपक कुमार यांनी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जमविल्याची माहिती पथकाला मिळाली होती. परंतु त्यांना ती संपत्ती किती असेल याचा अंदाजा नव्हता. दीपक कुमार सध्या हाजिपूर येथे कर्तव्यावर आहे. त्यापूर्वी ते कैमूर येथे कार्यरत होते. त्यादरम्यान त्यांनी न्यायदंडाधिकारी म्हणून तिथे चेकपोस्टवर ड्युटी केली आहे. याच काळात काळा पैसा जमिवल्याचे बोलले जात आहे.