नवी दिल्ली – कोणत्याही घटनेची माहिती आजकाल सर्वप्रथम सोशल मीडियाचे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर मिळते. त्यामुळे सर्व स्तरातील नागरिक यावर सक्रिय असतात. अगदी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यावर सक्रिय राहून चाहत्यांशी संवाद साधत असतात. या माध्यमाची ही झाली सकारात्मक बाजू. या माध्यमावर सायबर गुन्हेगार, भामटेही सक्रिय राहून अनेकांची फसवणूक करत असतात ही नकारात्मक बाजूसुद्धा आता प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी अद्याप कुठलाही ठोस मार्ग सापडला नाही. याचाच फटका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलला बसला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलला रविवारी पहाटे हॅकर्सनी खिंडार पाडले. पंतप्रधानांचे ट्विटल हँडल काही मिनिटांसाठी हॅक झाले होते. परंतु काही वेळात अकाउंट रिस्टोर करून या प्रकरणी ट्विटरकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.
पीएमओने ट्विट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल काही वेळासाठी हॅक झाले. याबाबत ट्विटरकडे तक्रार करण्यात आली असून, अकाउंट त्वरित रिस्टोर करून सुरक्षित करण्यात आले आहे. अकाउंट हॅक झाल्यानंतर काही मिनिटात करण्यात आलेल्या ट्विटकडे लक्ष देऊ नये.
पंतप्रधानांच्या अकाउंटवरून करण्यात आलेले विनाकामाचे ट्विट आता डिलिट करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांचे ट्विटरवर २.३४ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. पंतप्रधानांचे अकाउंट हॅक झाल्यानंतर भारतात #Hacked हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला. परंतु आता हॅकर्सकडून करण्यात आलेले ट्विट डिलिट करण्यात आले आहेत. काही युजर्सनी याचे कथित स्क्रिनशॉट घेऊन शेअर केले.
ट्विटवरील स्क्रिनशॉटनुसार, भारतात अधिकृतरित्या बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारसुद्धा ५०० बीटीसी खरेदी करून नागरिकांना वाटत आहे. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी पीएम मोदी यांच्या हँडलवरून हॅकर्सनी केलेले ट्विट शेअर करून लिहिले की, ‘गुड मॉर्निंग मोदीजी, सर्व काही ठीक आहे ना’?
तर काही युजर्स सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. वेद काकडे नावाच्या युजरने ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत लिहिले, की ”कृपया या लिंकवर क्लिक करू नये. हा एक घोटाळा आहे. पीएम मोदी यांचे अकाउंटसुद्धा सुरक्षित राहिले नाहीय. भारत हॅकर्स, घोटाळेबाज आणि परदेशी अजेंड्यातून सोशल मीडिया कसा सुरक्षित राहू शकतो”?
चिंतेची बाब
देशाच्या पंतप्रधानांचेच ट्विटर हँडल हॅक झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हॅकर्स हे पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलला लक्ष्य करीत असल्याने सुरक्षा तज्ज्ञांनी सरकारलाही खबरदारीचा सल्ला दिला आहे.