नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत आहेत. जागतिक योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांनी देशाच्या विविध भागात योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्याचा एक भाग म्हणून गृहमंत्री शाह हे नाशिकला येत आहेत. जागतिक योग दिनी म्हणजेच २१ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गुरुपीठ येथे शाह हे येणार आहेत. तेथे त्यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभांरंभ होणार आहे.
जागतिक योग दिनानिमित्त गुरुकुल प्रकल्प येथे बहुविध प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच, सद्गुरू मोरेदादा हॉस्पिटल शिलान्यास सोहळाही शाह यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये येऊन आढावा घेतला आहे. यावेळी कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच, कुठलीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घेतली जाणार आहे.