इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑस्ट्रेलियातील खलिस्तान समर्थकांनी पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले आहे. खलिस्तान समर्थकांनी शनिवारी ब्रिस्बेनमधील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली. स्थानिक मीडियाशी बोलताना मंदिराचे अध्यक्ष सतींदर शुक्ला यांनी सांगितले की, भाविक सकाळी मंदिरात पूजेसाठी पोहोचले होते, त्यावेळी त्यांना मंदिराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसले. हिंदू ह्युमन राइट्सच्या संचालिका सारा गेट्स म्हणतात की, शिख फॉर जस्टिसच्या धर्तीवर हा द्वेषपूर्ण गुन्हा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हिंदूंना घाबरवण्यासाठी हे केले गेले आहे.
परदेशी भूमीवर हिंदूंच्या श्रद्धा दुखावण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कॅरम डाउन भागात असलेल्या श्री शिव विष्णू मंदिरावरही भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. तीन दिवसीय थाई पोंगल सण मंदिरात तमिळ हिंदूंकडून साजरा केला जात असताना मंदिरात भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. 15 जानेवारी रोजी खलिस्तान समर्थकांनी मेलबर्नमध्ये कार रॅली काढून खलिस्तानच्या सार्वमतासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पाठिंबा मिळू शकला नाही. मेलबर्नमध्ये सुमारे 60,000 भारतीय वंशाची लोकसंख्या आहे, परंतु रॅली दरम्यान अत्यल्प लोक उपस्थित होते.
जानेवारी महिन्यातच ऑस्ट्रेलियातील मिली पार्क परिसरातील स्वामीनारायण मंदिरावर भारतविरोधी घोषणा लिहिण्याची घटनाही समोर आली होती. मेलबर्नमधील इस्कॉन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. हिंदू मंदिरांची तोडफोड आणि भारतविरोधी घोषणा लिहिल्याचा मुद्दाही भारत सरकारकडून ऑस्ट्रेलिया सरकारसमोर मांडण्यात आला होता. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
Hindu Temple Vandalise in Australia