नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-वणी रस्त्यावर असलेल्या ओझरखेड जवळ एका गुलमोहराच्या झाडातून अचानक झर्यासारखे पाणी येऊ लागले आहे. ही वार्ता परिसरात पसरली. बघता बघता तिथे गर्दी झाली. अनेकांनी हा चमत्कार असल्याचे सांगितले. काहींनी मोबाईल मध्ये चित्रण केले. तर काहींनी तीर्थ समजून बाटलीत ते पाणी भरून घरी नेले. मात्र, हे खरे आहे की खोटे याबाबत आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माहिती दिली आहे.
गुलमोहराच्या झाडातून पाणी येत असल्याचा व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल झाली आहे. ते पाहून दूरवरुन अनेक जण तेथे येत आहेत. कुणीही या मागचे कारण न जाणून घेता चमत्कार समजून त्यावर विश्वास ठेवला. परिसरात या निमित्ताने उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र या बाबतीत खरे कारण समजल्यावर गर्दी थांबली आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डाॅ.टी.आर.गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.
म्हणून येत होते पाणी
यासंदर्भात चांदगुडे यांनी सांगितले की, “सदर झाडाखालून पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर हे झाड लावल्याचे समजते. झाडाची मुळे खाली वाढून पाईपलाईन मध्ये शिरली. झाड जीर्ण होताच पाण्याच्या दाबामुळे मुळे, खोड यातून पाणी वरती आले. पाईपलाईन पाण्याचा प्रवाह थांबविला असता झाडातून पाणी येणे थांबते. याचा अर्थ हा चमत्कार नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये”
नाशिक मध्ये गुलमोहोराच्या झाडातून पाणी बाहेर येत असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी
खरे आहे की अफवा?
अनिसने दिले हे कारण pic.twitter.com/zGxNkqvTtv— India Darpan Live (@IndiaDarpanLive) December 28, 2022
Gulmohar Tree Water Viral Video Peoples Crowd
Superstition Science