नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ नोव्हेंबर, २०२२ या अर्हता दिनांकावर नाशिक विभाग पदवीधर मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम १ ऑक्टोबर, २०२२ पासून घोषित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पात्र पदवीधर मतदारांना नाव नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या २१ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या पत्रानुसार पदवीधर मतदार संघासाठीचा नमूना क्रमांक १८ ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही ऑनलाईन सुविधा https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate या मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्जासोबत रहिवासाचा पुरावा स्वयं साक्षांकित असावा. त्याचप्रमाणे अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेबाबतचे पुरावे म्हणून जोडण्यात आलेले पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका पदनिर्देशित अधिकारी, सहायक पदनिर्देशित अधिकारी, जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी, नोटरी यांच्याकडून प्रमाणित करून संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व पात्र पदवीधर मतदारांनी पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव ऑनलाईन सुविधेमार्फत देखील नोंदवावे.
Graduate Online Voter Registration Facility