लालबागचा राजा
गणेशोत्सव काळात मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहणारा सार्वजनिक गणपती म्हणजे लालबागचा राजा! लालबागच्या राजाची लोकप्रियता इतकी अफाट वाढली आहे की, आता गावोगावी आणि गल्लोगल्ली ‘अमुकाचा राजा’ आणि ‘तमुकचा राजा’ अशा नावांची हजारो मंडळ पहायला मिळू लागली आहेत. एवढंच नाही तर लालबागच्या राजाचं गणेशोत्सव काळात एका दिवसात दर्शन घेऊन वन डे रिटर्न होणाऱ्या आणि वर्षभर त्याची फुशारकी मारणाऱ्या भाविकांची संख्या देखील महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांत लालबागच्या राजाचे दररोज दीड ते दोन लाख भाविक दर्शन घेतात. लालबागच्या राजाची लोकप्रियता वाढण्याचे कारण अनेकांना ठाऊकच नाही.
लोकप्रियतेचे रहस्य
इ. स. १९३१-३२ ची ही गोष्ट आहे. मुंबई चहू अंगांनी वाढू लागली होती. विविध प्रकारचे उधोगधंदे या महानगरात येऊ लागले होते. भारताची आर्थिक राजधानीच्या रुपांत मुंबईची वाटचाल सुरु झाली होती. शेकडो कापड गिरण्या आणि हजारो गिरणी कामगार यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. परळ आणि लालबाग परिसरात गिरणी कामगारांच्या वसाहती झपाट्याने वाढू लागल्या होत्या. त्याचवेळी मुंबईवर राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारने लालबाग येथील पेरूची बाग आणि त्याच्या बाजूचे मार्केट उठवून तिथे नवीन कारखाना उभारण्याचा घाट घातला होता. यामुळे येथे मासे विक्री करणाऱ्या तसेच इतर उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या पोटावर पाय येण्याची शक्यता निर्माण झाली.आता का्य करावे हे कुणाला सुचत नव्हते.
याच काळात पुण्यात लोकमान्य टिळकांनी इ .स. १८९२ साली सुरु केलेल्या सार्वजनिक गणशोत्सवाचे लोण एव्हाना मुंबईत येऊन पोहचले होते. या सार्वजानिक उत्सवामुळे लोकांना एकत्र येण्याची संधीही मिळत होती. तोपर्यंत अनेक गणेशोत्सव मंडळे मुंबईत स्थापन झाली होती. अशातच लालबाग परिसरात मासे विक्री करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन गणपतीला साकडे घातले की, ‘हे गणपती बाप्पा आम्हाला आमच्या बाजारासाठी हक्काची जागा मिळू दे!’ या सगळ्यांनी ही प्रार्थना एवढी मनापासून केली. त्याला त्यावेळचे सर्व व्यापारी व प्रतिष्ठीत मंडळींनी एवढी साथ दिली की, वर्षभरातच मासे व इतर विक्रेत्यांना स्वत:चे हक्काचे मार्केट मिळाले.
कोळी व इतर व्यापाऱ्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार इ. स. १९३२ साली बंद होउन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला. गणपतीला केलेला हा पहिलाच नवस पूर्ण झाला म्हणून आनंदित होऊन या लोकांनी त्याच मार्केट मध्ये १९३४ साली एक गणेश मूर्ती आणून येथे गणेशोत्सव सुरु केला. स्थापनेच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच या गणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी किर्ती झाली. या गणपतीचे दर्शन घ्यायला येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. तेव्हापासून भाविक या गणपतीला वेगवेगळे नवस करतात. ते नवस पूर्णही होतात, अशी त्यांची श्रद्धा होती. आजही आहे. त्यामुळेच पाहता पाहता हा गणपती मुंबईतील गणेशोत्सवातील एक प्रमुख घटक बनला आहे.
लालबागच्या मार्केटमध्ये बसणारा गणपती म्हणून भाविक या गणपतीला ‘लालबागचा राजा’ म्हणू लागले. लालबागच्या भाविकांच्या मनावर राज्य करणारा तो – लालबागचा राजा! सुरुवातीपासून या गणपतीची मूर्ती विविध स्वरुपांत साकारली जाई. एका वर्षी हा गणपती मासेमारांच्या होडीत बसलेली साकारण्यात आला. एका वर्षी श्रीकृष्णाच्या रुपांत गीतोपदेश करणारा गणपती पहायला मिळाला. १९४६ साली श्रींची मूर्ती नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या रुपांत साकारण्यात आली. १९४७ साली देश स्वतंत्र झाला, त्यावर्षी मंडळाने पंडित जवाहर लाल नेहरु यांच्या वेशात श्रींची मूर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. १९४८ महात्मा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेषभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आले होते.
लालबाग मधील हा गणपती आणि गणपती भोवती असणारा देखावा हे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. हळूहळू या मूर्तीची उंची वाढविण्यात आली. सध्या स्थापन करण्यात येणारी लालबाग राजाची मूर्ती सुमारे २० फूट उंच असते. दरवर्षी या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी खुप दूरवरुन भाविक येतात. गणेशोत्सवातील ११ दिवसांत दररोज किमान दीड ते दोन लाख लोक लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. या गणेशाची मूर्ती त्याच जागेवर तयार केली जाते. मूर्ती बनविण्याची सुरुवात गणपतीच्या पायापासून केली जाते. त्याचदिवशी श्री गणेशाचा पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो.
गणेशोत्सवातील ११ दिवसात अनेक मोठ मोठे सेलिब्रिटी, उद्योगपती, खेळाडू आणि नेते मंडळी या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. या काळात विशिष्ट पोलिस पथक आणि सुरक्षा रक्षकांची समितीही येथे कार्यरत असते. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागलेली असते. नवसाच्या रांगेत तर लोक १५-१६ तास उभे असलेले पहायला मिळतात. १९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रिघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. मंडळातर्फे व्याख्याने आयोजित केली जातात. ग्रंथालय उपक्रम राबविला जातो. तसेच नेत्र तपासणी शिबीर, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यासारखी शिबिरे आयोजित केली जातात.
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही एखाद्या राजाला शोभेल अशीच असते. दुपारी दीड वाजता लालबाग मार्केट येथून बॅंड, लेझिम व ढोल-ताशांच्या जल्लोषात निघालेली मिरवणूक गिरगाव चौपाटीला पोहोचायला दूसरा दिवस उजाडतो. लालबागच्या राजाचं विसर्जन पहायलाही लोक हजारोंच्या संख्येने येतात. यावर्षी लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवाचे हे ८८ वे वर्ष आहे. सुधीर साळवी हे मानद सचिव आहेत. त्यांनी लालबागचा राजाच्या संकेतस्थळावर त्यांनी सांगितले १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या काळात महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिका आणि पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून भाविकांना ऑनलाईन दर्शन करता येईल. त्याचप्रमाणे लालबाग राजाच्या वेबसाइटवर बुकिंग करणाऱ्या भाविकांना घरपोच प्रसाद (२ लाडू) देखील पाठविण्यात येईल.
कसे जावे
मध्य रेल्वेने आपण करी रोड किंवा चिंचपोकळी स्टेशनवर उतरावे. येथून लालबागच्या राजापर्यंत पोहचायला १० ते १५ मिनिटे लागतात.
संपर्क : www.lalbagacharaja.org