विशेष प्रतिनिधी, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री संगिता बिजलानी आणि सुपरस्टार सलमान खान यांचे लग्न जुळले होते. दोघांच्याही लग्नाच्या पत्रिका छापून आल्या. काही ठिकाणी पोहोचल्याही, पण ऐनवेळी लग्नच रद्द झाले. आज संगिता बिजलानी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आणि सलमानच्या संबंधांच्या आठवणींना उजाळा देऊया…
एका सिंधी कुटुंबात संगिताचा जन्म झाला. सौंदर्याच्या जोरावर तिने मिस इंडियापर्यंत मजल मारली. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी तिने मॉडेलिंगमध्ये पाऊल टाकले. निरमा आणि पॉन्ड्ससारख्या दिग्गज ब्रॅंडसाठी तिने जाहिराती केल्या. १९८८ मध्ये ‘कातिल‘ या सिनेमातून तिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले होते. त्याच कालावधीत तिची सलामनसोबत मैत्री झाली.

१९८६ मध्ये दोघेही डेट करायचे. त्यावेळी तर संगिता चित्रपटांमध्येही आली नव्हती. जवळपास दहा वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांचे संबंध लग्नापर्यंत पोहोचले आणि लग्नपत्रिकाही छापून आल्या. पण ऐनवेळी ते लग्न रद्द झाले. सलमानने अनेकदा मुलाखतींमध्ये याची कबुली दिली आहे की पत्रिका काही ठिकाणी वाटल्यादेखील गेल्या होत्या.
जासिम खान यांच्या ‘बिईंग सलमान‘ या पुस्तकात यासंदर्भात दावा केला आहे. २७ मे १९९४ मध्ये हे लग्न ठरलेले होते, असे यात म्हटले आहे. सलमान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यातील जवळीक वाढलेली होती, त्यामुळे संगिताने ऐनवेळी या लग्नाला नकार दिला, असे सांगितले जाते.










