नवी दिल्ली – एका वृद्ध माणसाला किडनॅप करून त्याला मारहाण करणे व त्यानंतर त्याची दाढी कापतानाचा व्हिडीओ ट्वीटरवर आल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली. याविरोधात आरोपींवर गुन्हा दाखल झालाच, शिवाय कुठलीही सत्यता न तपासता व्हिडीओ पोस्ट करण्यास परवानगी दिल्याने ट्वीटरवरही गुन्हा दाखल झाला आहे.
ट्वीटरने सत्यता पडताळल्याशिवाय व्हिडीओ ट्रेंड करणे गुन्हाच आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गाझियाबादमध्ये ही घटना घडली या घटनेतून धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न झाला आहे. पत्रकार राणा अय्यूब, सपा नेता उम्मेद पहलवान आणि जुबेर हे मुख्य आरोपी आहेत. इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी आणखी एक व्हिडीओ पुढे आला. त्यात आरोपींनी धार्मिक नारेबाजी केली, असे सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ पीडित व्यक्तीच्या वतीने व्हायरल करण्यात आला. यात आरोपींनी स्वतः धार्मिक नारेबाजी केलीच, शिवाय पीडित व्यक्तीलाही धर्माचे नारे द्यायला लावले, असा आरोप करण्यात आला आहे.
धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे दोन–चार नव्हे तर या कृत्यामध्ये सामील १५ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
नेमके काय घडले
पीडित व्यक्तीचे नाव अब्दूल समद असे आहे. ते ताबीज तयार करण्याचे काम करतात. आरोपींचे म्हणणे आहे की अब्दूल यांनी दिलेल्या ताबीजचा आमच्या कुटुंबावर वाईट परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन अब्दूल यांना धडा शिकविण्यासाठी हे कृत्य केले.