नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी प्रकरणावरून संसदेत विरोधकांकडून सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्याला अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी आपले तोंड डेटॉलने धुवा, या शब्दात लोकसभेत बोलताना त्यांनी त्रागा व्यक्त केला.
गौतम अदानी यांच्यावरील आरोपांनंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. मोदी – अदानी भाई-भाईच्या घोषणा दिल्या जात आहेत. भाजपाला घेरण्याचा प्रयत्न होत असल्याने लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांत गदारोळ झाला. त्यावर निर्मला सितारमन यांनी संताप व्यक्त केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचारावर बोलण्याआधी डेटॉलने तोंड धुवा. भ्रष्टाचारावर कोण बोलतंय? बघा, असा उपरोधिक टोला सीतारामन यांनी लगावला.
इंधनावरील व्हॅट का कमी करीत नाही?
त्यांनी व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांवरही निशाणा साधला. लोकसभेला संबोधित करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने दोन वेळा इंधनावरील व्हॅट कमी केला. पण काही राज्यांनी मात्र व्हॅट कमी केला नाही. हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तिथे डिझेलवर व्हॅट का वाढवला? असा सवालही त्यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना विचारला.
आमचा संबंध नाही
अदानी उद्योग समूहावर ताशेरे ओढणारा अहवाल हिंडेनबर्गने प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोदी सरकारला जाब विचारणाऱ्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येऊ लागल्या. त्यावर या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे सरकारने तेव्हाच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून दररोज सरकारला अदानी प्रकरणावर धारेवर धरण्याचा प्रयत्न होत आहे.
Finance Minister Sitaraman in Loksabha Opposition