मुंबई – सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या काळात चांगल्या ऑफर्स मिळत असल्याने नागरिक आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्याचा बेत आखतात. परंतु कोरोना महामारीनंतर देशातच नव्हे, तर जगातही अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे घर किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची ही वेळ योग्य आहे किंवा नाही याबाबत नागरिक विचार करत आहेत. बांधकाम, रिअल इस्टेट, गृहकर्ज, गुंतवणूक सल्लागार, आर्थिक सल्लागार आदींच्या मते घर खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. हे फायदे असे
गृहकर्जाचे दर
आरबीआयने शुक्रवारी व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. कर्जावरील व्याजाचे कमी झालेले दर यापुढेही कायम राहतील. ६.५ टक्क्यांपासून सुरू होणारे गृहकर्जाचे व्याजदर घरखरेदीसाठी इच्छुकांना सर्वात फायदेशीर ठरू शकतात. फिक्स दरांवर गृहकर्ज घेणे सर्वात योग्य निर्णय असेल. अनेक बँका आता १५ ते २० आणि २० ते २५ वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्ज देत आहेत. त्याने ग्राहकांचे हफ्ते खूपच कमी होणार आहेत.
सणासुदीच्या ऑफर्स
नवरात्रात बांधकाम व्यावसायिक तसेच विकसक कंपन्यांनी अनेक प्रकारच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या काळात ग्राहकांना अनेक प्रकारची सवलत मिळते. पार्किंग चार्जेसमध्ये सवलत, एसी, टीव्ही किंवा इतर इन्टॉलेशन आदी मोफत मिळू शकतात. अनेक विकसकांनी सोडतीची योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये बंपर बक्षीसांची लयलूटही करण्यात आली आहे. वर्षाच्या इतर दिवसांमध्ये अशा ऑफर्स नसतात.
प्रोसेसिंग चार्जेस
सणासुदीचे दिवस असल्याने एचडीएफसीपासून ते आयसीआयसीआय बँकेपर्यंत अनेक बँकांनी ग्राहकांना गृहकर्ज प्रोसेसिंग चार्जेसमध्ये बरीच सवलत दिली आहे. अनेक प्रकरणांमध्ये ही सवलत ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. प्रोसेसिंग चार्जेसमध्ये २५ ते ५० टक्क्यांपर्यंतची सवलतही ग्राहकांना बचत करण्याची संधी देणार आहे.
मालमत्तांचे दर
या वर्षाच्या सुरुवातीला घरांची मागणी अचानक वाढल्याने घरांच्या किमतींनी उसळी घेतली होती. कोविडच्या तिसर्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली. त्यामुळे घरांच्या किमती स्थिर झाल्या. पुढील तेजी येण्यापूर्वी घर खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. कोविडची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर देशभरात घरांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकसुद्धा घरांच्या किमती निश्चित वाढवतील. त्यामुळे आता घरखरेदीचा निर्णय योग्य ठरेल.
महिलांसाठी
बांधकाम व्यावसायिकांपासून ते बँका महिलांना विशेष सवलत देत आहेत. बँकांकडून महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिलांच्या नावावर रजिस्ट्री केल्यावर सरकारकडूनही मुद्रांक शुल्कात सवलत मिळत आहे. या सर्व फायद्यांच्या पार्श्वभूमीवर पत्नी किंवा घरातील महिला सदस्याच्या नावाने घर खरेदी करून एक ते दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळवता येऊ शकतो.
पावसाळा
पावसाळा ऋतू संपल्यातच जमा आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पाकडे जाणार्या रस्त्यांचे खरे चित्र तुम्हाला दिसेल. तसेच फ्लॅट किंवा घराचे छत गळत असल्यास पावसाळा सुरू असल्याचा बहाणा बांधकाम व्यावसायिक करू शकणार नाही. ऑक्टोबरमध्ये घरे पाहणे सोपे ठरू शकते. एकूणच बांधकाम प्रकल्प पाहण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
सरकारी योजना
ग्राहकांना कर्जापासून ते इतर सब्सिडी आणि आर्थिक मदत देणार्या केंद्र सरकारच्या योजना अजूनही सुरू आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेऊन ग्राहक बचत करण्याची कक्षा आणखी वाढवू शकतात. अनेक बांधकाम व्यावसायिक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कागदपत्रे आदी तयार करण्यात मदत करतात. त्यामुळे योजनांचा लाभ मिळवताना कागदपत्रांसह इतर धावपळ ग्राहकांना करावी लागत नाही.
राज्य सरकार
देशातील अनेक राज्य सरकारांकडून बांधकाम व्यवसाय क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या सब्सिडी आणि दरांमध्ये सवलती देण्यात येत आहेत. या सवलतींचा लाभही ग्राहक घेऊ शकतात.
बांधकाम उपकरणे व वस्तू
गेल्या एका महिन्यापासून पोलाद आणि बांधकामासाठी लागणार्या उपकरणे आणि वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक किमती कमी झाल्याचा लाभ ग्राहकांना पटवून देत आहेत. इतर बांधकाम वस्तूंचेही दर कमी झाल्याने ग्राहक याचा लाभ घेऊ शकणार आहेत.