येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील कुसुर गावात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिवंत जाळलेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिलीप गायकवाड असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, अद्यापही १२ आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, दिलीप गायकवाड यांची शेतजमीन 223/2, म्हसोबा वाडी रोड, वस्ती शाळेजवळ, कुसुर येथे आहे. गायकवाड हे शेतात नांगरणीचे काम करीत होते. त्याचवेळी तेथे आरोपी संग्राम मेंगाळ व हिंगे यांच्यासह १२ जण आले. आमच्या शेतात नागंरणी का करतो? असा प्रश्न विचारत त्यांनी गायकवाड यांच्याशी वाद घातला. त्यानंतर या घोळक्याने गायकवाड यांच्या अंगावर थेट डिझेल टाकले आणि त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारात गायकवाड हे ४० टक्के भाजला. त्यामुळे त्यांना येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील २ आरोपी सध्या अटकेत आहेत. तर, फरार असलेल्या १२ जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक अनिल भवारी पुढील तपास करीत आहेत.