मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी (वय ६०) यांचे आज पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर जुहूच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांचे मूळ नाव आलोकेश लाहिरी असे होते. त्यांनी संगीतबद्ध केलेली असंख्य गाणी चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत. त्यांची बहुतांश गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या निधनामुळे बॉलिवुड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
तम्मा तम्मा लोगे, याद आ रहा है तेरा प्यार, डिस्को डान्सर ही बप्पी लहरी यांची सुपर हिट गाणी आहेत. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे 27 नोव्हेंबर 1952 रोजी झाला. उत्तम आवाज, लकब आणि संगीत यामुळे त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. 1973 मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरला नन्हा शिकारी या चित्रपटापासून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या गाण्यांनी चाहत्यांना भुरळ घातली. हटके संगीत हे त्यांचे वैशिष्ट्य होते. डिस्को डान्स हा त्यांच्या संगीताचा एक गाभा होता. त्यावर चाहते थिरकायचे. १९८० ते १९९५ पर्यंतच्या काळात त्यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या असंख्य गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच ते चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले. अलिकडचे त्यांचे सुपरहिट गाणे म्हणजे ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील ‘उ लाला’. हे गीत त्यांनी गायले आणि त्याला संगीतही दिले होते. डिस्को डान्सर, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, हिम्मतवाला, शराबी, डान्स डान्स, सत्यमेव जयते, शोला और शबनम या लोकप्रिय चित्रपटांमधील हीट गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.
काळा गॉगल, मोठे केस, गळ्यात सोन्याची चैन, हातात अंगठ्या, मनगटावर ब्रेसलेट अशा स्वरुपात चाहते त्यांना नेहमी पहायचे. त्यामुळेही ते अनेकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या जाण्याने संगीत आणि गायन क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. झोप आणि छातीशी संबंधित आजारामुळे त्यांचे निधन झाले. हॉस्पिटलमधून त्यांना घरी सोडण्यात आले. पुन्हा त्यांना त्रास झाल्याने तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातच त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
https://twitter.com/narendramodi/status/1493789034253938692?s=20&t=5Cyq0Tzcts7ePFS17lJEwQ