नाशिक : पेठरोडवरील दत्तनगर भागात बांधकाम साईटवरून पडल्याने कामगाराचा मृत्यु झाल्याच्या घटनेत पंचवटी पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ फेब्रुवारी रोजी दत्तनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करीत असतांना ही घटना घडली होती. बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवत संशयीतास अटक करण्यात आली आहे.
रवी मधुकर मोरे (३६ रा.चाणक्य सोसा.मेहरधाम) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार पठाण यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत संतोष नागनाथ हातांगळे (३५ रा.मायको दवाखान्याजवळ,फुलेनगर) या कामगाराचा मृत्यु झाला आहे. हातांगळे हा मजूर गेल्या मंगळवारी (दि.१) संशयीत ठेकेदार मोरे याच्या माध्यमातून दत्तनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करीत असतांना ही घटना घडली होती. दुपारच्या सुमारास काम करीत असतांना तो १५ ते २० फुटावरून जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. पोलीस तपासात ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधकामावर सुरक्षा जाळी,हेल्मेट व जॉकिट आदी पुरविणे गरजेजे असतांना कुठलेही साधणे पुरविण्यात आले नसल्याचे समोर आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून कामगाराच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयीत ठेकेदारास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.
……..