सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अभिनेत्री एव्हलिन शर्मा सध्या ट्रोल होत आहे. निमित्त आहे एका फोटोचे. या फोटोमध्ये एव्हलिन बाळाला स्तनपान करीत आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. मात्र, तिने यास सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे ही बाब सध्या सर्वत्र चर्चिली जात आहे.
‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एव्हलिन शर्माने नुकताच तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती कन्येला स्तनपान करत आहे. फोटोमध्ये एव्हलिन कॅमेराकडे बघत सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे कौतुक केले आणि आई-मुलीच्या या फोटोचे अनमोल वर्णन केले. या सोबतच ट्रोल करणाऱ्यांची सुद्धा कमी नव्हती. एव्हलिनच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी अश्लिल कमेंट करण्यास सुरुवात केली.
आता पहिल्यांदाच अभिनेत्रीकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. एव्हलिन शर्मा ट्रोल करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देत नाही. ती सांगते की, तिला मिळालेल्या सकारात्मक संदेशांवर तिचे लक्ष असते. आजकाल ती तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना एव्हलिन म्हणाली की, ‘मला आई म्हणून हा प्रवास माझ्या चाहत्यांसोबत आणि माझ्या मित्रांसोबत शेअर करायचा आहे. यासारखे फोटो संवेदनशीलता आणि ताकद एकत्र दाखवतात. मला ते सुंदर वाटले. स्तनपान हे नैसर्गिक आणि आरोग्यदायी गोष्टींपैकी एक आहे. मग कशाला लाज वाटायची?’
एव्हलिन पुढे म्हणाली की, ‘स्तनपानाबद्दल लोक काय विचार करतात, यापेक्षा हे कार्य जास्त कठीण आहे. तुम्ही नुकत्याच आई झाला असाल तर ती स्थिती कधीकधी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारी असू शकते. विशेषतः सुरुवातीच्या काळात जेव्हा बाळाला थोड्या अंतराने दूध पाजावे लागते. मातांना हे कळावे की, त्या यात एकट्या नाहीत. म्हणून मी माझी कथा शेअर केली आहे. आई झाल्यानंतर तिचे आयुष्य बदलले आहे, असे एव्हलिनचे मत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला कान्याप्रप्ती झाली. तिचे नाव ‘अवा’ असे ठेवले आहे.