मुंबई – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मंदाताई खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी संयुक्तरित्या भोसरी येथील भूखंड खरेदी केला आहे. त्यामुळे हे समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणात गिरीश चौधरी यांना बुधवारीच अटक झालेली आहे. तर एकनाथ खडसे यांची गुरुवारी तब्बल नऊ तास चौकशी झाली. आता मंदाताई खडसे यांना समन्स बजावून ईडीने चौकशीची व्याप्ती वाढवली आहे. पण, तूर्तास मंदाताई चौकशीला सामोरे जाणार नाही. त्यांनी मुदत मागून घेतली आहे. मंदाताई विकास दूध फेडरेशनच्या अध्यक्षा आहे.
खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ईडीची ही कारवाई सुरु झाल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. बुधवारी ईडीने त्यांचे जावई गिरीश चौधरींना अटक केली. त्यानंतर गुरुवारी खडसे यांची नऊ तास चौकशी झाली. आता त्यांच्या पत्नीला समन्स बजावण्यात आला आहे.
संयुक्तरित्या खरेदी
२०१६ मध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर याप्रकरणी विविध चौकशाही झाल्या. पण, त्यानंतर ईडीकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणात कारवाई केली. भोसरी येथील भूखंड हे ३१ कोटी रुपयांचे असतांना ३ कोटी ७ लाख रुपयाला घेण्यात आला, रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी केल्याचाही या प्रकरणात आरोप आहे. हा भूखंड मंदाताई खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी संयुक्तरित्या खरेदी केला आहे.
गुरुवारी ९ तास चौकशी
गुरुवारी खडसे यांनी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर त्यांची नऊ तास चौकशी झाली. ईडी कार्यालयातून ते रात्री ८.१५ वाजता बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद न साधता ते घरी निघून गेले. त्यांच्या वकीलांनी मात्र या चौकशीबाबत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सर्व प्रकारचे सहकार्य केले, जी कागदपत्रे हवी होती ती सर्व दिली. अजून जी कागदपत्र हवी ती १० दिवसाच्या आत देण्यास सांगितले आहे. ती दिली जाणार आहे. गरज पडेल तेव्हा खडसे चौकशीसाठी येतील असेही त्यांनी सांगितले. जे व्यवहार झाले त्याबाबत ईडीने विचारणा केली. एमआयडीसीच्या भूखंडाचे डिटेलही खडसे यांनी दिल्याचे ते म्हणाले.
कुछ तो होनेवाला है
गुरुवारी खडसे यांनी प्रकृती खालावल्यामुळे सकाळी असलेली पत्रकार परिषद रद्द केली होती. पण, ईडी कार्यालयात जातांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी ही चौकशी राजकीय हेतूने प्रेरीत आहे, पाच वेळा चौकशी झाल्यानंतर पुन्हा चौकशी होत आहे. गेल्या आठ दहा दिवसात व्हॅाटअॅपवर जळगावमध्ये एक मेसेज फिरतो आहे. त्यात कुछ तो होनेवाला है याचा अर्थ कार्यकर्त्यांना हे अगोदरच माहित आहे. मी ईडीला नेहमीच सहकार्य केले, आज जे प्रश्न विचारणार आहे त्याला उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे. तो मुळातच वादग्रस्त असल्याचेही ते म्हणाले.