नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना सध्या एटीएस पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कुरुलकर यांना पुणे सत्र कोर्टाने १५ मे पर्यंत एटीएस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्यावर खटला भरण्यात आला असून त्यांचा कसून तपास केला जात आहे. रॉकडूनही कुरुलकरांची चौकशी केली जात आहे.
चौकशीतून अनेक मोठे गौप्यस्फोट समोर येण्याची शक्यात वर्तवली जात आहे. मात्र याचवेळी दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायला सुरुवात केली आहे. प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यामुळे यावरून संघाला लक्ष्य करण्यात येत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात कुरुलकर स्वत:च संघाशी लहानपणापासून संबंधित असल्याचा दावा करताना दिसत आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात ट्वीट करताना सत्ताधारी आणि संघावर टीका केली आहे. काही संस्था तथा पक्षाशी संबंधित लोक दररोज अनेक भारतीयांना पाकिस्तानात जा, म्हणत धमकावत होते, ते आता स्वत:च पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडले गेले आहेत. तसेच मी देशाला झुकू देणार नाही’ म्हणणाऱ्यांच्या राष्ट्रवादाचे सत्य असेही खरगे यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
विशेष म्हणजे खरगे यांनी या ट्वीटमध्ये कुरुलकरांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यात कुरुलकर एका मुलाखतीमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या चार पिढ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं सांगताना दिसत आहेत. माझा मुलगा आता संघ कार्यात जातो. काही प्रमाणात सहभागी होतो. ही आमच्या घरातली चौथी पिढी आहे. माझे आजोबा शाखेत जायचे. त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले असून ते अतिशय चांगले गणिती होते. त्यांचे हिशोब पक्के होते. त्यामुळे शाखेचा निधी ठेवणे, त्याचा हिशोब ठेवणे असे काम त्यांच्याकडे असे. त्यानंतर ते काम कालानुरूप माझ्या वडिलांकडेही ती जबाबदारी आली. १९८२ ते १९९६ या १४ वर्षांच्या काळात मी पुण्याच्या शाखेत सॅक्सोफोन वाजवत होतो, असेही कुरुलकर या व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. त्यामुळे आता या व्हिडिओवरून खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/kharge/status/1657001366865182722?s=20
DRDO Director Pradip Kurulkar Video Viral