नवी दिल्ली ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचा समारंभ सोमवारी सकाळी १०.१५ वाजता नवी दिल्ली येथे संसद भवनाच्या सेन्ट्रल हॉल मध्ये होणार आहे. राज्यसभा सभापती, पंतप्रधान, देशाचे सर न्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, मंत्री परिषदेचे सदस्य, सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक अभियानांचे प्रमुख, संसद सदस्य आणि भारत सरकारचे प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभासाठी सेन्ट्रल हॉलमध्ये एकत्र येतील. विद्यमान राष्ट्रपती आणि नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे सेन्ट्रल हॉलमध्ये औपचारिक आगमन होईल. नवनिर्वाचित राष्ट्रपती भारताच्या सर न्यायाधीशांच्या उपस्थितीत आपल्या पदाची शपथ घेतील, त्यानंतर २१- तोफांची सलामी दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रपती भाषण करतील. सेन्ट्रल हॉल मधील समारंभा नंतर राष्ट्रपती, राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील, ज्या ठिकाणी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल आणि त्याच वेळी मावळत्या राष्ट्रपतींना सन्मानपूर्वक निरोप दिला जाईल.