मुंबई : राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, त्यामुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. बंडखोर गटातील अनेकांना विशेषतः त्या काळातील मंत्री असलेल्यांना आपल्याला पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षा वाटते, परंतु नेमके काय होईल ? हे सांगता येत नाही. सध्या बंडखोर गटातील आमदार संदीपान भुमरे हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. परंतु त्यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रचंड टीका केली. एका स्लीपबॉयला आम्ही मंत्री केले त्यांना धड बोलता येत नाही, भाषण देता येत नाही. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. सध्या देखील ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे याला कारण म्हणजे त्यांनी एका शिवसैनिकाला धमकी दिल्याचे सांगण्यात येते. एका कथित व्हिडिओ क्लिप मध्ये तसे दिसत असून ती प्रचंड व्हायरल होत आहे.
बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांची नावाने एका कथित ऑडिओ क्लिप सध्या तुफान व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये योगेश क्षीरसागर नावाच्या एका शिवसैनिकानं फोन केला होता. या फोन कॉल रेकॉर्डिंगची क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. संदीपान भुमरे हे पैठण मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली होती. मराठवाड्यातील एकेकाळचे शिवसेना नेते संदीपान भुमरे तेव्हा रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री होते, ते १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून पैठण विधानसभा मतदारसंघातून १९९५, १९९९, २००४, २०१४ आणि २०१९ मध्ये ५ वेळा विधानसभेवर निवडून आले होते आणि ते रेणुका देवी-शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवाचे चेअरमन आहेत. तसेच त्यांनी एकेकाळी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण येथे स्लिपबॉय म्हणून काम केले.
दरम्यान, आता शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पैठण दौऱ्या दरम्यान झालेल्या गर्दीवरुन शिवसैनिकांनी संदीपान भुमरे यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. या शिवसैनिकाला संदीपान भुमरे यांनी ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिले, तो आता चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसैनिक संदीपान भुमरे यांनी केलेल्या बंडखोरीवर नाराजी व्यक्त करताना दिसला. त्याच्यावर भुमरे यांनी सुनावले. नंतर याच शिवसैनिकाची समजूत काढण्याचाही त्यांनी नंतर प्रयत्न केला.
विशेष म्हणजे कथित ऑडिओ क्लिपमध्ये शिवसैनिक संदीप भुमरे यांना सुरुवातीला जय महाराष्ट्र म्हणतो. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगर मधील दौऱ्याबाबत विचारणा करतो. नंतर आदित्य ठाकरेंच्या रॅलीला झालेल्या गर्दीवर संदीपान भुमरेंना त्यानं टोला हाणल्यानंतर, संदीपान भुमरेही ‘लोकं तर येणारच ना’ असे म्हणतात.
त्यानंतर पुढे याच ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही असं करायला नाही पाहिजे होते, असे म्हणताच संदीपान भुमरे संतापल्याचे कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. उगा शहाणपणा नको करु, असं म्हणत संदीपान भुमरे यांनी शिवसैनिकाला सुनावलं. त्यानंतर पुढे त्यांनी त्यांची समजून काढत, तू भेटायला ये, तुला सगळं समजावून सांगतो, काय झालं, कशामुळे झालं, याचं स्पष्टीकरण देण्यावरुन ते युक्तिवाद करताना दिसून आलेत. दरम्यान, शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त वेगवेगळ्या शहरांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांच्या दौऱ्यादरम्यान, शिवसैनिकांचीही तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, विशेष करुन बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे यांच्याकडून शक्तिप्रदर्शन करण्यावर भर दिला जात असल्याची चर्चाही होत आहे.
माजी मंत्री तथा युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या बिडकीन दौऱ्यास शनिवारी मिळालेला पैठण तालुक्यातील शिवसैनिकांचा प्रतिसाद बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या गोटात धडकी भरवणारा ठरला आहे. राजकीय पटलावरील अनिश्चिततेने बंडखोर व मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांचे समर्थक सध्या संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मुंबई, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि परत मुंबई असा प्रवास करून आलेले भुमरे तेव्हा चर्चेत होते. कारण विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेले भुमरे थेट राज्यातील सत्ता बदल्यानंतर परत आले. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या बंडखोरी नाट्यात भुमरे यांचे नाव आघाडीवर होते. ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा त्यांनी बंडखोरी केल्याने त्यांची चर्चा झाली होती.
दरम्यान, भुमरे हे गेली पंचवीस वर्षे पैठण मतदारसंघाच नेतृत्व करतात. ठाकरे सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. सोबतच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीनंतर पैठण येथील बहुतांश शिवसैनिकांनी शिंदे गटात राहणे पसंद केले. राज्यातील सत्तांतरानंतर भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे काल जोरदार स्वागत झाल्याने भुमरे गटात अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येते.