नवी दिल्ली : खरे म्हणजे शिक्षण क्षेत्र हे अत्यंत पवित्र मानले जाते, परंतु या क्षेत्रात देखील अलीकडच्या काळात या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा दिसून येतो, शिक्षक भरती घोटाळ्याच्या महाराष्ट्रात अनेक घटना निदर्शनास येतात. परंतु पश्चिम बंगालमध्ये देखील अशाच प्रकारचा घोटाळा उघडकीस आला असून यामध्ये खोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले आहे याप्रकरणी ईडीने कडक कारवाई करीत जप्तीची मोहीम राबविली आहे.
१) ईडीने पश्चिम बंगालमध्ये छापे टाकले, यात उद्योग मंत्री पार्थ चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात आतापर्यंत २० कोटी इतकी रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम एसएससी घोटाळ्याशी संबंधीत असावी असा संशय आहे. ही रक्कम मोजण्यासाठी नोटा मोजण्याची मशीनची मदत घेतली जात आहे. अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मानली जाते. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
२) अर्पिता मुखर्जी यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली. अर्पिता मुखर्जी यांच्या डायमंड सिटी येथील फ्लॅटमध्ये अनेक खोक्यांमध्ये भरलेल्या नोटा सापडल्या. शनिवारी दिवसभर या नोटा मोजल्या जात होत्या. ही रक्कम जवळपास ७५ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. मंत्री पार्थ चटर्जी यांनादेखील कोलकात्यातील बँकशॉल कोर्टात सादर करण्यात आले.
३) पार्थ चटर्जी यांच्यावर मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ यांना कोर्टाने दोन दिवसांच्या ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्पिता मुखर्जी यांना आज सोमवारी कोर्टासमोर हजर केले जात आहे. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्यातील १३ ठिकाणांवर छापे मारले. यात अर्पिता मुखर्जींच्या फ्लॅटमधून कोट्यवधी रुपयांच्या नोटा मिळाल्या.
४) अर्पिता मुखर्जी एक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. त्यांनी ओडिशा फिल्म इंडस्ट्रीत अनेक चित्रपटांत भूमिका केली आहे. तर काही तमिळ चित्रपटांतही त्या झळकल्या. पार्थ चटर्जी यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांच्या अनेक सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक वर्षांपासून अर्पिता या कोलकात्यातील आलीशान फ्लॅटमध्ये राहतात. पार्थ चटर्जी यांच्या पूजा समितीतही त्या आहेत. पूजेच्या पेंडॉलच्या सर्व आयोजनात त्यांचा सहभाग असतो. पेंडॉलच्या प्रचार-प्रसारासाठी छापलेल्या पोस्टर्सवर अर्पिता यांचे फोटो असतात.
५ ) अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ चटर्जी यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचार आणि शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी लाच घेतल्याचा आरोप पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून एवढा पैसा जप्त केल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात जणू भूकंप आला आहे.
६) तृणमूल काँग्रेसचे एक जिल्हाध्यक्ष आणि मातब्बर नेते अनुब्रत मंडल यांच्या सुरक्षारक्षकाकडून १५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अजूनही अनेक गोष्टी बाहेर येणं बाकी आहे. अर्पिता मुखर्जी यांचे ८ फ्लॅट आहेत. तर आणखी एका मंत्र्याची निकटवर्तीय महिलेकडे १० फ्लॅट असल्याचे सांगण्यात येते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोग आणि प्राथमिक शिक्षा बोर्डात झालेल्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले होते.
७) दरम्यान, खडगपूर कॅपच्या सीआरपीएफ जवानांच्या मदतीसह ईडीच्या सुमारे ९० अधिकाऱ्यांनी एकाच वेळी १४ ठिकाणी छापे टाकले होते. संध्याकाळपर्यंत कोट्यवधी रुपयांची रक्कम हाती आली. अर्पिता मुखर्जी यांच्या घरात ११ तास छापा टाकला गेला. या घरात दोन बॅग सापडल्या ज्यात मोठ्या प्रमाणात रक्कम होती. ईडीला या दोन बॅगांमधून २ हजार रुपयांच्या नोटा मिळाला. विशेष म्हणजे या सर्व नोटा अगदी नव्या कोऱ्या होत्या. राज्याच्या पहिल्या उद्योग मंत्री असलेल्या चटर्ची यांची चौकशी देखील करण्यात आली. तसेच त्यांच्या दक्षिण कोलकाता येथील घराची तपासणी करण्यात आली.