नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या नाशिकमधील चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. डॉ. दीक्षित यांचे मोफत मार्गदर्शन क्लिनिक आता सोमवार ते शनिवार सुरू राहणार आहे. त्याचा लोकार्पण सोहळा १८ मार्च रोजी संपन्न होणार आहे.
दिवसातून दोनदा जेवा आणि ४५मिनिटात ४.५किमी चाला ह्या साध्या सोप्या पद्धतीने डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक लोकांना स्थूलता व मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत केली आहे. महाराष्ट्र व इतर राज्यात देखील अनेक शहरांमध्ये ह्या जीवनशैली बद्दल माहिती देणारी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नाशिक मध्ये २०१८ पासून लॉकडाउन पर्यंत आय.एम.ए. हॉल शालीमार येथे आठवड्यात एक दिवस तर लॉकडाउन नंतर कॅनडा कॉर्नर जवळ मार्गारेट टॉवर येथे सोम. ते शनि. हे केंद्र सुरू होते. आता ‘गजानन ॲनेक्स’, मॅग्नम हॉस्पिटल शेजारी, पाटील लेन नं.१, कॉलेज रोड, नाशिक येथे सी.टी.आर.कंपनी, अंबड, नाशिक यांच्या सहकार्याने हे केंद्र सोमवार ते शनिवार ४.३० ते ८.३० या वेळेला कार्यरत असेल.
२०१८ पासून अनेक लोकांनी याचा लाभ घेऊन स्वतःचे वजन तर कमी केले आहेच पण मधुमेह आणि त्यांची औषधं देखील कमी किंवा बंद झाली आहेत. सदर केंद्राचा लोकार्पण सोहळा दिनांक १८ मार्च २०२३, शनिवार, सकाळी ११.०० वा. ‘रावसाहेब थोरात सभागृह’, केटीएचएम कॉलेज शेजारी, गंगापूर रोड नाशिक येथे सी.टी.आर. कंपनीचे उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय वाकचौरे यांच्या हस्ते व डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.
या कार्यक्रमात आतापर्यंत नाशिक मध्ये दीक्षित जीवनशैली सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्यांचा व नाशिक मधील नामवंत डॉक्टर्स ज्यांनी यासाठी वेळ देऊन तसेच आपल्या रूग्णांना ही जीवनशैली करण्यासाठी प्रोत्साहन दिले अशांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अधिक माहितीसाठी 9322014152 किंवा 9322260866 ह्या नंबर वर संपर्क करावा.
आरोग्यप्रेमी नाशिककरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवीन जागेतील केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक केंद्राच्या मुख्य समन्वयक डॉ. रत्ना अष्टेकर, अडोर ट्रस्टचे विश्वस्त श्री. संजय मोरे तसेच समन्वयक वंदना जोशी व नंदन देशपांडे यांनी केले आहे.
Dr Jagannath Dixit Consulting Clinic Nashik