दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथे बाकेराव हरी जाधव (६०) हे आपल्या शेतातील विहिरीकडे घरातील पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी जात असताना अचानक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात जाधव यांच्या मानेला, गळ्याला, तसेच पायाला मोठ्या प्रमाणत जखमा झाल्या आहे. जाधव यांनी जोरदार प्रतिकार केला व तसेच आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी त्वरित आले. त्यामुळे या जाधवांची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच खेडगाव येथे आणले असता त्यांना मोठ्या प्रमाणत टाके पडले आहे. पुढील उपचारासाठी दुस-या हॅास्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
सोनजांब ,जवळके वणी , गोंडेगाव परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणत वावर नेहमीच असतो. अनेक शेतक-यांचे कुत्रे, शेळ्या या बिबट्यांनी आातापर्यंत फस्त केल्या आहे. अनेक वेळा शेतक-यांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. मात्र आतापर्यंत या परिसरात कधीही पिंजरा लावण्याची तस्ती वनविभागाने घेतलेली नाही. वनविभाग शेतकरी वर्गाची बिबट्याची शिकार होण्याची वाट बघत आहे की काय ? असा प्रश्न येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. लवकरात लवकर या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त वनविभागच्या आधिकरी वर्गाने करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.









