दिंडोरी – तालुक्यातील बोपेगाव येथे तीन दिवसात दोन माजी सरपंच यांचे निधन झाल्याने बोपेगाव व परिसरावर शोककळा पसरली.
१३ ऑगस्ट रोजी सायंकाळी माजी सरपंच वैशाली वसंतराव कावळे (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पती सरपंच वसंतराव कावळे, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचेवर १४ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी १५ ऑगस्ट रोजी माजी सरपंच तथा कादवा कामगार युनियनचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय धोंडीराम वाकचौरे (वय ५७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुली मुलगा असा परिवार आहे. डी. डी.वाकचौरे हे राज्य साखर कामगार संघटनेचे खजिनदार, त्रिपक्षीय समिती सदस्य होते. कादवा सहकारी साखर कारखान्याचे कार्यलक्षी संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष होते. राज्यातील साखर कामगाराचे प्रश्न सोडविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.