जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कलाविष्कार लोकांपुढे मांडण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले आहे. या व्यसपीठावरील काय कधी लोकांना पसंत पडेल सांगता येत नाही. सध्या अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने खान्देशासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावरील अनेक रिल्स देखील व्हायरल होत आहेत. लग्न, वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमांसह थेट शाळेच्या गॅदरिंगमध्ये देखील या गाण्याची क्रेझ दिसते. जळगावातील एका शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात या गाण्यावरील डान्सदरम्यान उपस्थित साऱ्यांनीच ठेका धरला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
अहिराणी गाण्यांमध्ये सध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या गाण्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने खूप भाव खाललाय. खान्देशात वाढदिवसाचा कार्यक्रम असो, लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम असो, हे गाणं वाडतंच. विशेष म्हणजे फक्त अहिराणीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात या गाण्याचे चाहते आहेत. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात लाखो प्रेक्षकांनी यूट्यूबवर हे गाणे पाहिले आहे. विनोद कुमावत आणि गायक भैय्या मोरे या दोन तरुणांनी हे गाणे लिहिले आणि त्यांनीच पुढील सोपस्कार पार पाडत व्हीडियोही तयार केला. या गाण्याने यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंतच्या अवघ्या दोन महिन्यात तब्बल 30 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. 1 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यू होतात, याचाच अर्थ 60 मिलियन म्हणजे तब्बल 6 कोटी प्रेक्षकांनी अवघ्या दोन महिन्यात हे गाणे पाहिले आणि ऐकले आहे.
https://www.facebook.com/100044741015509/videos/695720282140499/
साऱ्यांनाच भुरळ
या अहिराणी गाण्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगावर तालुक्यातील व्ही. बी. पाटील प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या गॅदरिंगमध्ये या गाण्यावर विद्यार्थ्यांनी डान्स केला. स्टेज आणि समोर उपस्थित सारेच विद्यार्थ्यांनीही अगदी धुमाकूळ घातल्याप्रमाणे बेधुंद होऊन नाचण्याचा आनंद घेतला. मुलं काही केल्या ऐकत नसल्याने अखेर गाणेच बंद करावे लागले. जळगाव जिल्ह्याच्या युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे यांनीदेखील संबंधित व्हिडीओ शेअर केला. खान्देशी गीतांची आज वाढती लोकप्रियता पाहून मनाला खूप आनंद देऊन जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
रोकडे म्हणाल्या की, आज खानदेशी गीतांची वाढती लोकप्रियता पाहून मनाला खूप आनंद देऊन जाते. ही लोकप्रियता पाहता गाणे हे खानदेशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खानदेशी गीतांचा डंका वाजविला जात आहे. लग्न असो किंवा कुठलाही समारंभ खानदेशी गीतांशिवाय पूर्णच होत नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण नुकत्याच झालेल्या धरणगाव येथील एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सध्याचे चर्चेत असलेले हाई झुमका वाली पोर या खानदेशी गाण्यावरील प्रेम. हे रंगमंचावरच नव्हे प्रेक्षकांमध्येही पाहायला मिळाले. बेधुंद नाचणारे विद्यार्थी स्नेहसंमेलनाचा मनमोकळेपणाने आनंद घेत असल्याचे पाहून खुप समाधान वाटते.
Dharangaon School Gathering Video Viral Khandeshi Song