मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती. राज्य सरकारने व्हॅट कमी करण्याची घोषणा केल्यानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के!
इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!
म्हणजेच फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1528372234204590080?s=20&t=A5NVcGN8L3eRSQXuKnTCNw