बाबा पवार, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देवळा : जिल्हा बँकने टॉप थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळवला असून, देवळा तालुक्यातील टॉप १५० थकबाकीदारांना कर्ज वसुली बाबत जिल्हा बँकेने अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. वेळीच कर्ज भरून सहकार्य न केल्यास या बड्या थकबाकीदारांचे नाव वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येऊन कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने आता देवळा तालुक्यातील टॉप थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. जिल्हास्तरावरील टॉप शंभरावर सुरू असलेली कारवाई आता देवळा तालुक्यातील टॉप १५० थकबाकीदारांवर होणार आहे. देवळा तालुक्यात एकूण २२४८ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे २२ कोटी ३९ लाख ५६ हजार अधिक होणारे व्याज इतकी थकबाकी आहे. त्यापैकी तालुक्यातील १५० टॉप थकबाकीदारांकडे १० कोटी ५७ लाख ५१ हजार अधिक होणारे व्याज इतकी थकबाकी असून, कर्ज वसुली बाबत संबंधितांना जिल्हा बँक प्रशासनाच्या वतीने अंतिम नोटिसा बजावल्या आहेत.
देवळा विभागात जिल्हा बँकेच्या वतीने आज पर्यंत २७८ शेतकऱ्यांचे लिलाव लावण्यात आले होते. त्यापैकी १५२ कर्जदारांनी ३ कोटी २० लाख ४२ हजार थकबाकी भरल्याने त्यांचा जमीन लिलाव टळला आहे. तर उर्वरित १२६ थकबाकीदारांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन १००/८५ अंतर्गत कारवाई करून, त्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेचे नाव लावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. थकबाकी वसुलीसाठी सहकार खाते, विभागीय अधिकारी, बँक निरीक्षक, वसुली अधिकारी व संस्था सचिव यांनी कंबर कसले असून युध्दपातळीवर वसुलीचे काम सुरु केले आहे.
नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जातील
देवळा तालुक्यातील बड्या १५० थकबाकीदारांवर तातडीची वसुलीची कारवाई होणार आहे. तत्पुर्वी त्यांना अंतिम सूचनापत्र देऊन थकबाकी भरण्याविषयी कळविण्यात आले आहे. त्यातून होणारी कारवाई टाळावी, अन्यथा त्यांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जातील. पुढील कारवाई बँक व सहकार खाते संयुक्तरीत्या करेल.
राजेंद्र भामरे, विभागीय अधिकारी जिल्हा बँक देवळा