नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेने तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन, अर्थात पर्यटन रेल्वे गाडीच्या माध्यमातून, “श्री रामायण यात्रा” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे यात्रा ७ एप्रिल २०२३ रोजी नवी दिल्ली इथल्या सफदरजंग रेल्वे स्थानकापासून सुरू होणार असून, या प्रवासात भगवान श्री रामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल.
ही प्रस्तावित रेल्वे यात्रा आधुनिक सुविधांनी युक्त भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट रेल्वेने आयोजित केली जाईल. आतापर्यंत २६ भारत गौरव रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
स्टेट ऑफ आर्ट डिलक्स एसी टुरिस्ट रेल्वे गाडीमध्ये उत्तम भोजन सुविधा देणारी दोन उपहारगृहे, आधुनिक स्वयंपाकघर, डब्यांमध्ये शॉवर क्यूबिकल्स, फूट मसाजर यासह अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. पूर्णपणे वातानुकूलित गाडीमध्ये फर्स्ट एसी आणि सेकंड एसी असे दोन प्रकारचे प्रवासी डबे असतील. गाडीतील प्रत्येक डब्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक, अशी सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.
बहुप्रतीक्षित रेल यात्रा, “श्री रामायणयात्रा” १७ रात्री /१८ दिवसांच्या प्रवासाला निघणार असून, अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचलम, नागपूर या महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन, ती नवी दिल्ली इथे परतेल.
देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या “देखो अपना देश” आणि “एकभारत श्रेष्ठभारत” या उपक्रमाच्या अनुषंगाने ही विशेष पर्यटक रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असून, गाडीच्या 2AC वर्गासाठी रुपये १,१४,०६५/-, 1AC वर्गाच्या केबिन साठी रुपये १,४६,५४५/-, आणि 1AC कुपे साठी रुपये १,६८,९५०/- प्रति व्यक्ती या दराने शुल्क आकारले जाईल.
अधिक तपशीलांसाठी आपण IRCTC वेबसाइटला भेट देऊ शकता: https://www.irctctourism.com वेब पोर्टलवर प्रथम येणाऱ्याला प्राधान्य, या तत्त्वावर ऑनलाइन आरक्षण सेवा उपलब्ध आहे.
https://twitter.com/PBNS_India/status/1539581466182557701?s=20