नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्यास राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. यासोबतच दिल्लीतील सर्व आमदारांचा पगार आता ६६ टक्क्यांनी वाढला आहे. आता दिल्लीच्या आमदाराला ९० हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. दिल्लीतील आमदारांचे पगार यापूर्वी ५४ हजार रुपये होते.
पगारवाढीच्या या प्रस्तावाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर विधी, न्याय व विधिमंडळ कामकाज विभागाने पगारवाढीची अधिसूचना जारी केली आहे. आता मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना पगार आणि भत्त्यांसह एकूण 1.70 लाख रुपये दरमहा मिळणार आहेत, तर आधी त्यांना ७२ हजार रुपये मिळत होते. विशेष म्हणजे ४ जुलै २०२२ रोजी दिल्ली विधानसभेत या पगारवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
१२ वर्षांनी वाढ
दिल्लीतील आमदारांचा पगार तब्बल १२ वर्षांनंतर वाढला आहे. विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १४ फेब्रुवारी २०२३ पासून आमदारांच्या वाढीव वेतनाची प्रणाली लागू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलै महिन्यात वेगळी विधेयके मंजूर करून पगारवाढीचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. प्रसाराचा विचार केल्यानंतर, राष्ट्रपतींनी १४ फेब्रुवारीला त्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे आमदारांच्या पगारात ६६ टक्के वाढ झाली आहे.
असा मिळतो पगार
आमदारांचे मूळ वेतन पूर्वी १२ हजार होते ते आता ३० हजार झाले आहे. दैनिक भत्ता १००० होता तो आता १५०० झाला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांचे मूळ वेतन १८ हजारांवरून ६० हजार झाले आहे. इतकेच नाही तर याशिवाय आमदारांना वार्षिक १ लाख रुपये प्रवास भत्ता मिळणार आहे, जो आतापर्यंत ५० हजार रुपये होता. दिल्लीतील आमदारांना प्रत्येक टर्ममध्ये लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल खरेदीसाठी १ लाख रुपये मिळणार आहेत.
Delhi MLA Salary Allowance Increased