इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
लेख १६ वा
नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान
श्री क्षेत्र कारंजा
श्रीदत्त परिक्रमेत प्रत्येक दत्तस्थानाला काही ना काही महत्व आहे. आज आपण ज्या श्रीक्षेत्र कारंजाला जाणार आहोत. त्याचे महत्व तर अगाध आहे कारण ही आहे व्दितीय दत्तावतार असलेल्या श्रीनृसिंह सरस्वती यांची जन्मभूमी. त्यांच्या जन्मानंतर सुमारे पांच सहाशे वर्षांनी अगदी योगायोगाने दत्ताचा तिसरा अवतार असलेल्या श्रीवासुदेवानंद सरस्वती यांना हे स्थान सापडले आणि श्रीब्रह्मानंद सरस्वती यांनी स्वामींच्या जन्मस्थानावर गुरूमंदिर उभारले. हा सर्व इतिहास मनोरंजक आणि आश्चर्यचकित करणारा आहे.गुरुलिला अगाध असते याचा प्रत्यय येतो!!
थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे. श्री वासुदेवानंदसरस्वती व श्री ब्रह्मानंदसरस्वतीस्वामी यांच्या प्रयत्नामुळेच श्रीगुरूंच्या या जन्मस्थानाची महती सर्व दत्तभक्तांना झाली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर-यवतमाळ या रेल्वेरस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे. साठ सत्तर हजार लोकसंख्येच्या या गावी चांगली बाजारपेठ असून गुरुमंदिरामुळे दत्तभक्तांनाही ते प्रिय झाले आहे.
श्रीगुरुंच्या जन्मस्थानाचा शोध अलीकडेच लागला असला तरी प्राचीन काळातही या क्षेत्राचे महत्त्व होतेच. याच कारंजनगरीत श्री नृसिंहसरस्वती शके १३००च्या सुमारास जन्मास आले. इ.सन १९०५ मध्ये श्री वासुदेवानंदसरस्वतींनी या नगरीत श्री राम मंदिरात काही दिवस मुक्कामाला राहिले होते.त्यावेळी ‘माझे वास्तव्य येथेच आहे’ असा दृष्टांत त्यांना झाला.
सन १९२०-२१मध्ये श्रीलीलादत्त उर्फ ब्रह्मीभूत ब्रह्मानंदसरस्वती यांनाही या स्थानाची ओढ लागून येथे गुरुमंदिर उभारावे अशी प्रेरणा झाली. त्यांना तेथे स्थापन करण्यासाठी, निर्गुण पादुकाही मिळाल्या. श्रीगुरुंचे मंदिर, त्यांची मूर्ती, त्यांच्या पादुका यांची सिद्धता होऊन सन १९३४ च्या सुमारास आणखी एका या जुन्या दत्तक्षेत्राची नव्याने निर्मिती झाली. अतिशय जागृत स्थान असल्याने येथेही श्री नृसिंहसरस्वतींचा वा दत्तात्रेयांचा साक्षात्कार अनेकदा साधकांना झालेला आहे. मूर्तीच्या निर्मितीचा मनोरजंक इतिहास गुरुमंदिरातील मूर्ती अतिशय रम्य व बालसंन्यासी रुपातली आहे. या मूर्तीच्या निर्मिती विषयी मनोरजंक इतिहास सांगितला जातो. मंदिर बांधण्याचे काम पूर्णावस्थेला आले. त्यात श्री नृसिंहसरस्वतींची मूर्ती स्थापन करण्याची वेळ जवळ आली. परंतु श्रीगुरूंची प्रतिमा कशी तयार करावयाची हा प्रश्न होता. श्रीगुरूंची प्रतिमा तयार करण्याकरिता अस्सल व एकमेव उपलब्ध साधन म्हणजे श्री गुरुचरित्रात त्यांचे वर्णिलेले शब्दचित्र हेच होय.
गुरुचरित्रातील स्वामींचे शब्दचित्र आणि सध्या आद्य श्री शंकराचार्यांचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्राच्या नमुन्याप्रमाणे श्री नृसिंहसरस्वतीस्वामींचे छायाचित्र काढावे असे श्री ब्रह्मानंदसरस्वती यांनी ठरविले. ते काम त्यांचे शिष्य व भक्त मुंबई स्कूल ऑफ आर्टसचे माजी मुख्याध्यापक श्री. रा. बा. धुरंधर यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई स्कूल ऑफ आर्ट्सचे तत्कालीन प्राचार्य श्री. सालोमनसाहेब यांचा व श्री ब्रह्मानंदस्वामी यांचा परिचय असल्यामुळे त्यांनीही स्वयंस्फूर्तीने मीही एक चित्र काढतो असे स्वामींना सांगितले. अशा प्रकारे श्री ब्रह्मानंदस्वामींच्या आज्ञेने दोघांनीही श्रींचे चित्र काढण्याचे ठरविले.
एके दिवशी त्या दोघांनाही श्री गुरुमूर्तीचा स्वप्न साक्षात्कार होऊन ‘मला नीट न्याहाळून घ्या व आपले चित्र काढा’ अशी आज्ञा झाली. साक्षात्काराच्या अनुभवानुसार दोघांनीही स्वतंत्रपणे काढलेली आपआपली चित्रे स्वामींच्या जवळ आणून दिली. आश्चर्याची गोष्ट अशी की, ती दोन्ही चित्रे अगदी तंतोतंत एकाच नमुन्याची होती. या दोन महान चित्रकारांच्या चित्रकलाचातुर्याने व नैपुण्याने सर्वसाधारण जनतेलासुद्धा श्रींच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे, श्रींची मूर्ती घडविण्यास लागणारा खर्च देण्याची इच्छा श्री. धुरंधर यांनी व्यक्त केली व श्री ब्रह्मानंदस्वामींनी त्या गोष्टीस संमती दिली. तसेच श्री. एम. ए. जोशी यांनी श्रींच्या चित्राचे छायाचित्र काढून दिले व श्री दत्तात्रेयाची तसबीर करून दिली.
जयपूर येथे श्रींची संगमरवरी पाषाणाची नयनमनोहर मूर्ती तयार करवून ती श्री ब्रह्मानंदसरस्वतींनी स्वत: आपल्याबरोबर मोटारीतून कारंजा येथे आणली. शके १८५६ चैत्र शुद्ध १३ पासून पंचान्हिक दीक्षेने प्रारंभ करून चैत्र वद्य २लाच (दिनांक १/४/१९३४) चित्रा नक्षत्रयुक्त वृषभ लग्नाच्या सुमुहुर्तावर श्री गुरुनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या ह्या मूर्तीची मंदिरात त्यांनी प्रतिष्ठापना केली. त्याचबरोबर श्रीदत्तात्रेय, श्रीचिंतामणी गणपती, श्रीकाशीविश्वेश्वर व श्रीगुरुकृपा यांचीही स्थापना करण्यात आली.
कारंजा क्षेत्राचे महात्म्य
कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणातील ‘पाताळखंडा’मध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख आहे. विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या करंज क्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मीळता होती. ऋषिमुनींना पिण्यापुरते देखील पाणी नव्हते. म्हणून वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंजमुनी यानी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला. इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला. रेणुकादेवी करंजमुनींच्या पुढे प्रकट झाली. तिने करंज क्षेत्राचे माहात्म्य वर्णन केले.
वसिष्ठ-शक्ति-संवादातून यमुना-महात्म्य वर्णन केले. गंगा व यमुना बिंदूमती कुंडात आहेत. (बेंबळपार नावाने सध्या हे कुंड प्रसिद्ध आहे.) गंगा व यमुना कुंडात गुप्त होऊन बिंदुमती (बेंबळानदी) या नावाने वाहतात. ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे. यमुना-महात्म्य सांगून रेणुका देवी गुप्त झाली. नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्यांने सर्व नद्या व तीर्थे यांना आवाहन केले. त्यामुळे तो तलाव पाण्याने ताबडतोब भरला. करंजमुनींच्या कृपा प्रसादाने शेषराज आपल्या कुळासह आपले गरुडापासून संरक्षण व्हावे म्हणून या क्षेत्रात वस्तीला आले. म्हणून करंज क्षेत्राला ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव पडले आहे, असे सांगितले जाते.
निर्गुण पादुकांची विशेष नित्यपूजा
कारंजा येथील गुरूमंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक वगैरे झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते. बरोबर आठ वाजता शंखनाद होतो. त्यावेळी निर्गुण पादुका जेथे नेहमी ठेवण्यात येत असतात, तेथून त्या उचलून घेऊन डब्यांची झाकणे काढण्यात येतात. पादुकांवर अत्तरमिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेविलेल्या चौरंगावर उघडय़ा डब्यात ठेवण्यात येतात. त्यावेळी भक्तमंडळींना त्याचे दर्शन घेता येते. श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात येतात. साधारणपणे नैवेद्य समर्पण करे पर्यंत त्या उघडय़ा ठेवतात. नंतर त्या पादुका डब्यात ठेवून डबे बंद करण्यात येतात. नंतर ते डबे, ठेवण्याकरिता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.
कसे जावे?
वाशीम, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे ६० कि. मी. अंतरावर असून या शहरातून कारंजासाठी नियमीत बस सेवा आहे. मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशनवर उतरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते. इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
संपर्क: श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा, जिल्हा वाशीम – ४४४१०५.
गुरुमंदिर कारंजा फोन-(०७२५६) २२४७५५,२२२४५५ मोबाईल 7499932731
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्रीदत्तात्रयांचा दुसरा अवतार असलेल्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जन्म भूमी असलेल्या श्रीक्षेत्र कारंजाचे दर्शन घेतले.उद्या आपण गजानन महाराजांची लिलाभूमी असलेल्या श्रीक्षेत्र शेगावचे दर्शन घेऊ या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com/श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Datta Parikrama Narsinha Saraswati Birthplace Karanja by Vijay Golesar
Religious Washim