इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यास स्थानिक पदाधिका-यांनी विरोध केला होता. आता हा विरोध मावळला असून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त लागणार आहे. स्थानिक पातळीवर आरोप – प्रत्यारोप होत असतात. पण, पक्ष वाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होतो. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिले.
भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार म्हणाले की, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल जळगावला बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सांगितले की, आपण जरी त्यांना पक्षात घेतले नाही तर ते इतर पक्षात जाणारच आहेत. त्यामुळे त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे. असे त्यांनी आम्हाला सूचित केलेले आहे. यावेळी वरिष्ठांनी आम्हाला शब्द दिला आहे की, स्थानिकांच्या कुठल्याही हक्कावर अडसर येणार नाही. त्यामुळे ते स्वत.च्या इच्छेने प्रवेश करत असतील तर प्रवेश द्यावा असे त्यांनी सांगितले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून गेलेले गणेश गिते यांची देखील भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा ढिकले यांनी पराभव केला.
याअगोदर बावनकुळे यांनी बडगुजर यांना पक्षाची दारे उघडे करुन दिली
ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर १७ गुन्हे दाखल आहे. ज्यांचे संबध दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर आहेत अशा बडगुजर यांना पक्षात घेऊन नये अशी मागणी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी केली. त्याला एक दिवस उलटत नाही तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांना पक्षाची दारे उघडे करुन दिली. काही दिवसापूर्वी ते नाशिकमध्ये आले असता त्यांनी सांगितले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत गिरीश महाजन लक्ष घालत आहे. पक्ष वाढीसाठी सर्वांना दार खुले आहे. असे सांगत त्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिका-यांचा विरोध आहे. त्याबाबत चर्चा केली जाईल असे सांगून बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपाबाबतही वक्तव्य केले. ते म्हणाले की फक्त आरोप आहे. ते सिध्द झाले नाही.
शिवसेना शिंदे गटाचाही होता विरोध
मुंबई बाँम्बस्फोटातील दहशतवादी सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे आरोप आहेत. स्व. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनीही बडगुजर यांना शिवसेनेत ठेवलेच नसते. त्यामुळे, त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास सर्व शिवसैनिकांचा विरोधच राहील असे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी याअगोदरच स्पष्ट केले होते.
ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांनी महायुती विरोधात गरळ ओकली होती. कुंभमेळा लक्षात घेऊन ठेकेदारी साठीच त्यांना सत्तेत सहभाग हवा असल्याचे आरोपही प्रसिद्ध झाले आहेत. शिवसेनेत जनसामान्यांना सोबत घेऊन वाटचाल करणे वंदनीय बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अपेक्षित होते. त्यांच्या शिकवणीतून शिवसेनेचा झेंडा घेऊन सामाजिक कार्यात उतरणाऱ्यांना शिवसेनेची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा विरोधच राहील असे तिदमे यांनी सांगितले.