विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सायबर गुन्हेगारीत फसवणूक झालेल्या लोकांना त्यांचे पैसे परत मिळू लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय हेल्पलाइन १५५२६० च्या मदतीमुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये ३.१३ कोटी रुपये फसवणूक झालेल्या लोकांना परत देण्यात आले आहेत. हा हेल्पलाइन नंबर एक एप्रिलपासून सात राज्यांमध्ये लाँच करण्यात आला होता. १६ जूनला संपूर्ण देशात तो खुला करण्यात आला होता. आतापर्यंत १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही हेल्पलाइन कार्यान्वित झाली आहे. इतर राज्यातही हेल्पलाइन सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे.
अनेक दिवसांनंतर परिणाम
हेल्पलाइन नंबर सुरू झाल्याच्या इतक्या कमी वेळात सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात फसलेल्या लोकांना दिलासा मिळू लागला आहे. दिल्लीच्या शाहदरा येथील ज्येष्ठ नागरिक राम प्रकाश यांची ४ जूनला सायबर फसवणूक झाली होती. त्यांनी तत्काळ हेल्पलाइन नंबर १५५२६० वर फोन केला. काही दिवसांतच ३.२ लाख रुपये त्यांच्या खात्यात परत आले.
महिलेचीही फसवणूक
अशाच प्रकारे मध्य प्रदेशच्या एका महिलेला युरोपीयन व्यक्तीने ऑनलाइन फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. महिलेने विनंती स्वीकारल्यानंतर तिला कोट्यवधीची भेट पाठविण्याचे आमिष दाखवून तिची ५९,५०७ रुपयांची फसवणूक झाली. महिलेच्या तक्रारीनंतर एअरटेल पेमेंट बँकमधून तिला तिची रक्कम परत देण्यात आली.
३.१३ कोटी रुपये परत
एक एप्रिलला हेल्पलाइन नंबर लाँच झाल्यानंतर आतापर्यंत तिच्या मदतीने ३.१३ कोटी रुपये लोकांना परत करण्यात आले. गृहमंत्रालयाने या हेल्पलाइनच्या कार्यपद्धतीची माहिती देताना सांगितले, की फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर त्वरित तक्रारकर्त्याच्या नंबरसह फसवणूक झालेल्या बँकेची सविस्तर माहिती संबंधित बँक आणि वॉलेटला पाठविली जाते.
संशयास्पद व्यवहार बँकेकडून फ्रीज
बँकेच्या सिस्टिममधून ही माहिती फ्लॅश केल्यानंतर संबंधित बँक किंवा वॉलेटमध्येच पैसे असतील तर बँकेकडून ती रक्कम फ्रीज केली जाते. जर पैसे दुसर्या बँक किंवा वॉलेटमध्ये गेले तर ती रक्कम संबंधित बँक किंवा वॉलेटमध्ये माघारी पाठवेल. त्या पैशांची ओळख पटवून ते फ्रीज केल्याशिवाय ही प्रक्रिया सुरूच राहील.
२४ तासांच्या आता माहिती
तक्रारकर्त्याला एसएमएसद्वारे तक्रार नोंदविल्याची सूचना आणि त्यांचा एक नंबर दिला जाईल. तसेच २४ तासांच्या आत नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर फसवणुकीची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
या राज्यांमध्ये नंबर लाँच
गृहमंत्रालयाचे एक वरिष्ठ अधिकारी सांगतात, एक एप्रिलला दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, छत्तीसगड या राज्यात नंबर लाँच करण्यात आला होता. १७ एप्रिलला पूर्ण देशात हा नंबर खुला करण्यात आला आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, दमणस दीव आणि दादर नगर हवेलीमध्ये लाँच करण्यात आले आहे