इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘कानून के हाथ बहुत लंबे होते!’ किंवा ‘मुजरिम कितना भी चालाख हो, उसे पकडना मुश्किल नही होता ! ‘ यासारखे अनेक डायलॉग हिंदी चित्रपटांमध्ये आपण पूर्वी ऐकले आहेत. सध्या देखील काही चित्रपटांमध्ये असे डायलॉग आढळतात. एकूणच सांगण्याचे तात्पर्य म्हणजे गुन्हेगार कितीही चलाख (हुशार)असला तरी त्याला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणा कसोशीने प्रयत्न करते आणि बहुतांश वेळा गुन्हेगार किंवा आरोपी पकडला जातो.
आता तर यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देखील मदत घेण्यात येते, सायबर क्राईम सारखे गुन्हे वेगवेगळ्या सायबर तंत्रज्ञानाने शोधून काढले जातात. परंतु अशाच प्रकारे एक तुरुंगातून फरार झालेला गुन्हेगार पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क गुगल मॅप ची मदत घेतली. परंतु हे प्रकरण आपल्या देशातील नसून परदेशातील आहे हे येथे नमूद करावे लागेल.
गुगल मॅप हे नागरिक, वाहनचालक किंवा प्रवाशांना योग्य मार्ग तर दाखवतोच पण माफियांचा शोधही घेतो. कारण 20 वर्षांपूर्वी स्पेनमधून पळून गेलेल्या कुख्यात माफियाला पकडण्यात गुगल मॅप्सने इटालियन पोलिसांना मदत केली. इटालियन पोलिसांनी एका खतरनाक फरारी माफियाला पकडले असून तो सुमारे 20 वर्षांपूर्वी तुरुंगातून पळून गेला होता आणि हे काम केवळ गुगल मॅपमुळेच शक्य झाले आहे.
विशेष म्हणजे दोन वर्षांच्या तपासानंतर, 61 वर्षीय जिओआचिनो गॅमिनोला स्पेनमधील गालापागर येथे शोधण्यात पोलीसांना यश आले आहे. जिथे तो खूप काळापासून तोतया किंवा दुसऱ्याच नावाने लपला होता. गालापागर हे शहर राजधानी माद्रिदपासून जवळ आहे. गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यू चित्रात एका व्यक्तीचे चित्रण केले आहे असून तो अगदी माफियासारखा दिसत होता, तेथूनच पोलिसांना इशारा मिळाला आणि त्यांनी कसून तपास सुरू केला.
इटालियन अँटी-माफिया पोलिस युनिटचे उपसंचालक निकोला अल्टीरो म्हणाले की आम्ही पारंपारिक पद्धतींद्वारे विकसित करत असलेल्या तपासाला अधिक गतीमान करण्यासाठी फोटोग्रामने आम्हाला मदत केली. गॅमिनो हा स्टिडा नावाच्या सिसिलियन माफिया गटाचा सदस्य असून तो सन 2002 मध्ये रोमच्या रेबिबिया तुरुंगातून निसटला आणि सन 2003 मध्ये काही वर्षांपूर्वी केलेल्या हत्येसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. सध्या गॅमिनो सध्या स्पेनमध्ये कोठडीत आहे आणि त्याला फेब्रुवारीच्या अखेरीस इटलीला परत आणण्याची शक्यता आहे.