इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात अंधश्रद्धेचे अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक म्हणजे अंगात येणे होय. स्त्री-पुरुष, लहान-मोठे अशा कोणाच्याही अंगात आल्याचा प्रकार दिसतो. सर्व धर्माच्या व्यक्तींमध्ये दिसते. मात्र विशिष्ट परिस्थितीतच हे घडते. साधारण धार्मिक विधी किंवा उत्सवाच्या वेळेला हे घडते. शहरात कमी तर गावाकडे जास्त प्रमाणात हा प्रकार दिसतो.
राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेचे भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. एका किशोरवयीन मुलीने आपल्या ७ वर्षांच्या चुलत बहिणीचे मुंडके उडवून हत्या केली. ही दुर्घटना डुंगरपूर जिल्ह्यातील चितरी पोलीस स्टेशन अंतर्गत झिंझवा फाला गावात घडली आहे. अंगात देवी आल्याचे सांगत मुलीने एकच गोंधळ घातला. या हल्ल्यात मुलीचे वडील आणि काकाही जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे.
अंधश्रद्धा व्यक्त करण्याचा हा खूप वर्षांपासून सुरू असलेला मार्ग आहे. समाजाला आणि साधारण व्यक्तीला त्याचा मानसिक आधार मिळतो आणि ती त्या समाजाची पद्धत असते. बहुतेक वेळेला त्या गावातील देव किंवा कुणी थोर व्यक्ती त्यांच्या अंगात येतात. मग हा प्रकार आजाराचा नाही. काही व्यक्ती उगीच खोटे वागून समाजाचे शोषण करतात. अंधश्रद्धा वाढवून त्याचा फायदा घेण्याचा आणि फसवणुकीचा हा प्रकार असतो.
या व्यक्तीचा इतरांना त्रास होतो, ती त्या समाजाचा भाग क्वचितच असतात आणि ते इतर फसवे प्रकार करत असतात. अंगात येण्याच्या घटना अशिक्षित, समाजविरहित राहणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष यांच्याबाबतीत घडतात. या व्यक्ती सतत एकच विचार करीत असतात. यामुळे भावनिक व अंधश्रद्धाळू विचार त्यांच्या मनात येतात. पारंपरिक मतांचा, संस्कारांचा बडगा याला कारण असतो.
वास्तविक अंगात येणे याबाबत समाजात धार्मिक भावभावना, परंपरा दिसतात. मात्र, अंगात येणे ही मनाची विशिष्ट अवस्था असते. हा एक आजार असल्याचे सिद्ध झाले आहे. अशिक्षित, कौटुंबिक समस्या असलेल्या किंवा समाजात न मिसळणाऱ्या एकलकोंड्या व्यक्तींमध्ये अंगात येण्याचे प्रमाण अधिक जाणवते. स्वतःकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांची बुद्धी हे कृत्य करायला भाग पाडते.
खरे म्हणजे हा आजार पझेशन सिंड्रोम प्रकारात मोडतो. पझेशन सिंड्रोम म्हणजे मनाचे खेळ. यात अशिक्षित मनुष्याच्या मनात मानसिक भावनेशी संबंध असलेले खेळ अधिक रंगतात. पझेशन सिंड्रोममध्ये गुरफटलेल्या व्यक्ती त्यांच्या मनातील खळबळ कोणाकडे व्यक्त करू शकत नाहीत. कोंडमारा सहन करण्याची त्यांची इच्छा संपल्यावर त्यांच्या अबोध मनाची अवस्था या क्रियेचा (अंगात येणे) शस्त्र म्हणून वापर करते. पझेशन सिंड्रोम असलेला व्यक्ती अधूनमधून एखाद्या वेगळ्याच चरित्रासोबत जोडला जातो. या चरित्रासंबंधित वर्तनही करीत आपल्या इच्छा व्यक्त करतो.
चितरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या झिंझवा फाला गावात रविवारी रात्री दशा माता व्रत उत्सवादरम्यान एका १५ वर्षीय मुलीने आपल्या अंगात देवी आल्याचे सांगत तलवारीने गोंधळ घातला. तसेच तेथेच झोपलेल्या आपल्या ७ वर्षीय चुलत बहिणीवर तलवारीने वार करून तिची मान धडापासून वेगळी केली. हरियाली अमावस्येच्या दिवसापासून चितारी झिंझवा फाला येथील शंकरचा मुलगा रामजी डेंडोर यांच्या घरी दशामातेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. त्याअंतर्गत रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दशामातेच्या पूजेचा कार्यक्रम रात्री आठ वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
शंकरच्या या मुलीने हातात नंग्या तलवार घेऊन लोकांना सांगितले की ती सर्वांना ठार करेल. असे म्हणत ती तलवार घेऊन घराच्या अंगणात धावू लागली, असे पोलीस अधिकारी गोविंद सिंह यांनी सांगितले. शंकर आणि त्याचा मोठा भाऊ सुरेश यांनी मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान मुलीने वडील आणि काकांवर तलवारीने वार केले. त्यामुळे दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. यादरम्यान सुरेशची सात वर्षांची मुलगी पुष्पा ही त्याच घरात घरात झोपली होती. मुलगी तिच्याजवळ गेली आणि तिला ओढत घरातील दुसऱ्या खोलीत नेले आणि तलवारीने तिचा गळा कापला. या घटनेची माहिती मिळताच चितरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलीला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Crime Young Girl Murder Sister Superstition
Rajasthan Dungarpur