नाशिक रोड – येथील बिटको चौकातील टेलिपॅथी मोबाईल दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ६० लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार दोन लाख रुपये रोख व ५८ लाख रुपयाचे मोबाईल असल्याचे बोलले जात आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास ही चोरी करण्यात आली आहे. या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर लाईट बंद करुन टॉर्चच्या सहाय्याने ६० हून अधिक विविध कंपनीचे मोबाईल चोरुन नेले. हे चोर बाहेर पडताना त्यांनी बाहेरील गेट लोखंडी रॉडच्या सहाय्याने तोडले. त्यानंतर ते येथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त शिद्देश्वर धुमाळ, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, गुन्हे शाखा दोन चे आनंदा वाघ, नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, श्वान पथकाचे योगेश कोंडे, भास्कर गांगुर्डे घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण माहिती घेऊन पुढील तपास नाशिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.